लंडन : इंग्लंडविरुद्ध ओव्हल मैदानात पाचव्या टेस्ट मॅचमध्ये टॉस करून धोनीनं आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवलाय. विदेशी भूमीवर सर्वात जास्त मॅचमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करण्याच्या सौरव गांगुलीच्या रेकॉर्डची महेंद्र सिंग धोनीनं बरोबरी केलीय.
भारताकडून सर्वाधिक 58 टेस्ट मॅचमध्ये कर्णधार म्हणून जबाबदारीचा रेकॉर्ड अगोदरपासूनच आपल्या नावावर असलेल्या धोनीनं विदेशी मैदानावर 28 व्या वेळेस टीमचं नेतृत्व केलंय. टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनंही 28 मॅचमध्ये परदेशी भूमीवर भारतीय टीमचं नेतृत्व केलं होतं. यापैंकी 11 मॅचमध्ये टीम इंडियाला यश मिळालं होतं तर 10 मॅच गमवावा लागल्या.
आकडेवारीवर लक्ष टाकलं तर असं लक्षात येईल की परदेशी जमिनीवर धोनीचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही. त्याच्या कॅप्टन्सीमध्ये आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या 27 टेस्ट मॅचमध्ये भारतानं सहामध्ये विजय मिळवलाय. तर 13 मॅचमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय.
धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये भारतानं परदेशी जमिनीवर गेल्या 15 मॅचमध्ये केवळ एकदा विजय मिळवलाय. (सध्या सुरू असलेल्या श्रृंखलेतल्या लॉर्डस टेस्टमध्ये). तर तब्बल 11 मॅचमध्ये भारतीय टीमला पराभव पत्करावा लागलाय.
भारताकडून परदेशात सर्वाधिक मॅचमध्ये कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडण्याच्या सूचीत गांगुली आणि धोनीनंतर मोहम्मद अझरुद्दीन (27), सुनील गावसकर (18) आणि राहुल द्रविड (17) यांचा नंबर लागतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.