www.24taas.com, झी मीडिया, पालघर
पालघर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणारे अनेक उपकेंद्र रात्रीच्या वेळी बंद असल्याची गंभीर बाब झी मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झालीय. त्यामुळं आरोग्यावर कोट्यवधी रुपये खर्च होणाऱ्या आरोग्य खात्याला जाग कधी येईल हा प्रश्नच आहे.
पालघर तालुक्यातील पूर्वपट्टा आणि आदिवासी बहुल परिसरात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रावर योग्य आणि नियमित सेवा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून गेल्या अनेक दिवसांपासून होत आहेत.
वारंवार होणाऱ्या तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेवून पालघर पंचायत समितीच्या विद्यमान सभापती विभा राऊत, उपसभापती सोनाली गवळी आणि जिल्हापरिषद सदस्या अर्चना पाटील यांनी काल रात्री झी मीडियाच्या मदतीनं सोमटा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या नानीवली, बोरशेती, किराट, गुंदले, आणि दामखिंड या पाच उपकेंद्राला भेट दिली असता सोमटा प्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त डॉक्टर उपस्थित होते.
याशिवाय उपकेंद्रावर एकही परिचारीका अथवा साधा शिपाईही आढळला नाही. सर्वच उपकेंद्राला टाळी असल्याचं भयाण वास्तव झी मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. त्यानंतर आपण संबंधित गावातील गावकऱ्यांना याबाबत विचारणा केली असता उपकेंद्रावर रात्रीच्या वेळीस कोणीही उपस्थित नसल्यामुळं छोट्या-छोट्या उपचारासाठी रात्री-उपरात्री तालुक्याला रुग्णांना घेवून जावं लागतं. शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि उपकेंद्रातील परिचारीका (नर्स) यांच्याकडून इंजेक्शन आणि सलाईनचे पैसे घेतले जात असल्याचं नागरिकाचं म्हणणं आहे.
ग्रामीण भागातील गरीब आणि आदिवासी लोकांना चोवीस तास आरोग्य सेवा मिळावी यासाठी आरोग्य विभागाकडून अनेक ठिकाणी लाखो रुपये खर्च करुन उपकेंद्र बांधण्यात आलीत. गरोदर महिला आणि गरीब बालकांना तात्काळ सेवा मिळावा या उद्देशानं या उपकेंद्रात परिचारीकेनं चोवीस तास राहणं बंधनकारक असतानाही एकही परिचारीका (नर्स) इथं रात्रीच्यावेळी सोडाच तर दिवसाही आढळून येत नाहीत.
त्यामुळं शासानाचा यांच्यावर होणारा खर्च व्यर्थ असल्याचं भयाण सत्य समोर आलंय. राष्ट्रीय बाल स्वास्थ आणि ग्रामीण आरोग्य अभियानांची उद्धाटन काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते मोठ्या गाजावाजा करत पालघरमध्ये झाला. मात्र त्याच पालघर तालुक्यातील मनोर ग्रामीण रुग्णालय वैद्यकिय अधिकारी नसल्यामुळं बंद आहे. अनेक प्राथमिक केंद्रावर एकच वैद्यकीय अधिकारी तसंच उपकेंद्रावर कोणीच हजर नसल्यानं गरीब आणि आदिवासी रुग्णांना कोणीच वाली नसल्याचं भयाण वास्तव समोर आलंय. त्यामुळं आता तरी आरोग्यखात्यानं डोळे उघडून आपली जबाबदारी पार पाडावी हीच अपेक्षा व्यक्त होतेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ