नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी लोकसभेत आर्थिक वर्ष 2017-18 साठी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये करदात्यांना मोठा दिलासा मिळालाय, असं म्हणता येईल.
बदललेल्या स्लॅबनुसार, वार्षिक 3 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलंय. तर 3-5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर केवळ पाच टक्के कर आता करदात्यांना भरावा लागणार आहे... या स्लॅबमधील करदात्यांना याआधी 10 टक्के कर भरावा लागत होता.
जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करताना सध्या इमानदार करदात्यांवर आणि वेतनधारकांवर कराचा मोठा बोजा असल्याचं म्हटलं. नोटाबंदीनंतर या करदात्यांना सरकारकडून करात सूट मिळण्याची मोठी अपेक्षा असल्याचंही त्यांनी म्हटलं. यावेळीच त्यांनी नागरिकांना, जर तुम्ही 3 ते 5 लाख रुपयांपर्यंत तुमचं उत्पन्न असेल तर शेवटच्या स्लॅबमध्ये येत असलेला 5 टक्के कर भरून राष्ट्र निर्माणात भागीदार होण्याची विनंतीदेखील केलीय.