एका पर्वाची अखेर...

अरविंद मफतलाल यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी मध्यप्रदेशातील चित्रकूटमध्ये निधन झालं. भारतीय उद्योगजगतातील एका महापर्वाची अखेर झाली. आजच्या पिढीला अरविंद मफतलाल यांचे नाव फारसं परिचीत असण्याची शक्यता तशी कमीच पण भारतीय उद्योगक्षेत्राच्या जडणघडणीत भरीव कामगिरी करणाऱ्या मफतलाल यांचे योगदान दुर्लक्षित करण्यासारखं नाही.

Updated: Nov 14, 2011, 08:20 AM IST

झी२४तास वेब टीम, मुंबई

अरविंद मफतलाल यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी मध्यप्रदेशातील चित्रकूटमध्ये निधन झालं. भारतीय उद्योगजगतातील एका महापर्वाची अखेर झाली. आजच्या पिढीला अरविंद मफतलाल यांचे नाव फारसं परिचीत असण्याची शक्यता तशी कमीच पण भारतीय उद्योगक्षेत्राच्या जडणघडणीत भरीव कामगिरी करणाऱ्या मफतलाल यांचे योगदान दुर्लक्षित करण्यासारखं नाही.

 

अरविंद मफतलाल यांच्या आजोबांनी १९०५ साली मफतलाल उद्योगसमुहाची स्थापना केली होती. अरविंद मफतलाल यांनी १९५४ साली या उद्योगसमुहाची सूत्रं हाती घेतली. त्यांच्या नेतृत्वाखालीच मफतलाल उद्योगसमुहाने नेत्रदिपक कामगिरी करुन दाखवली.  मफतलाल उद्योगसमूहाने अनेक दशकं आघाडीच्या पहिल्या दहा उद्योगसमुहांमध्ये आपलं स्थान अबाधित राखलं. कापड निर्मितीच्या क्षेत्रात मफतलाल उद्योगसमुहाचा दबदबा मोठा होता. त्याव्यतिरिक्त पेट्रोकेमिकल्स मध्ये मफतलाल यांच्या नॅशनल ऑरगॉनिक केमिकल्स लिमिटेड म्हणजे नोसिल आणि पॉलीओलिफिन्स या कंपन्यांनी पथदर्शी कामगिरी बजावली. कॉम्प्युटर सॉफ्टवेअरच्या क्षेत्रातही एकेकाळी मफतलाल कन्सलटन्सी या कंपनीनेही अशीच पथदर्शी कामगिरी करुन दाखवली. पण ऐंशीच्या दशक संपतासंपताच नव्वदच्या दशकात मफतलाल उद्योगसमुहाच्या पडझडीचा काळ सुरु झाला. नोसिलचे विस्तारीकरण रखडलं आणि मफतलाल यांनी भागीदार असलेल्या रॉयल डच शेल यां कंपनीचा हिस्सा विकत घेतला. पण नोसिलला उतरलती कळा लागली ती लागलीच. त्याहीआधी मफतलाल उद्योगसमुहाचे विभाजन झालं होतं. मफतलाल उद्योसमुहावर कर्जाचा डोंगर चढला पण नितीमत्तेला कायम जपणाऱ्या या उद्योगघराण्याने संपूर्ण कर्जाची परतफेड व्याजासकट केली. आर्थिक स्थिती पूर्वपदावर यायला बराच कालावधी लागला. त्यामुळेच आर्थिक उदारीकरणाचा लाभ मफतलाल उद्योगसमुहाला घेता आला नाही.

 

त्याही आधी ऐंशीच्या दशकात कळवा इथे असलेली एनएमएम कापड व्यवस्थापन आणि कामगरांच्या वादात बंद पडली ती कायमचीच बंद झाली. गिरण्यांना लागणारी यंत्रसामुग्री बनविण्यात ही कंपनी त्याकाळी आघाडीवर होती.  अरविंद मफतलाल यांचे चिरंजीव पद्मनाभ मफतलाल यांचेही अकाली निधन झालं. त्यानंतर अरविंद मफतलाल यांचे दसरे चिरंजीव हृषीकेश मफतलाल यांनी समर्थपणे मफतलाल उद्योगसमुहाची धूरा सांभाळली. मुंबईत कापडगिरण्यांना घरघर लागली त्यात मफतलाल यांच्या अनेक मिल्सही बंद झाल्या त्यात मफतलाल फाईन सारखी बलाढ्या कंपनी देखील होती. एवढ्या साऱ्या पडझडीत फक्त नवीन फ्लोरिन टेक्सटाईल्स लागणाऱ्या फ्लूरो केमिकल्सची निर्मिती करणारी कंपनी आणि रबर केमिकल्सच्या क्षेत्रातील हेक्सट मफतलाल या कंपन्या आपलं स्थान टिकवण्यात यशस्वी झाल्या. या व्यतिरिक्त डेनिमच्या उत्पादनातील मफतलाल डेनिमचीही आघाडीच्या कंपन्यांमध्ये गणना करण्यात येते.

 

उद्योगक्षेत्राव्यतिरिक्त अरविंद मफतलाल यांनी गांधीवादी मणीभाई देसाई यांच्या समवेत भारतीय ऍग्रो इन्डस्ट्रीज फाऊंडेशनची म्हणजेच बायफ स्थापना केली. देशातील भटक्या जमाती आणि भूमीहीनांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसंच संशोधन आणि विकास यात बायफने राष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घेतली आहे. बायफमुळे देशभरातील १६ राज्यातील ४५ लाख कुटुंबांना लाभ झाला आहे. मफतलाल महिला सक्षमीकरणासाठी कायम आग्रही राहिले आणि त्यांनी यासाठी पाठबळ दिलं.