घटस्फोटासाठी नेली नकली बायको...

एका पतीने चक्क बोगस पत्नीलाच न्यायालयात हजर करून घटस्फोट मिळविल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण हाताळणार्‍या दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी या पतीची चांगलीच खरडपट्टी काढतानाच हा घटस्फोट रद्दबातल ठरवत त्याला २ लाख रुपये दंडही केला.

Updated: Aug 5, 2012, 01:03 PM IST

www.24taas.com,  नवी दिल्ली

 

एका पतीने चक्क बोगस पत्नीलाच न्यायालयात हजर करून घटस्फोट मिळविल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण हाताळणार्‍या दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी या पतीची चांगलीच खरडपट्टी काढतानाच हा घटस्फोट रद्दबातल ठरवत त्याला २ लाख रुपये दंडही केला. नवी दिल्ली येथे राहणार्‍या सुरजीत सिंह आणि मनप्रीत कौर यांचे २२ जानेवारी २००२ रोजी लग्न झाले होते.

 

लग्नानंतर ते कालकाजी येथे राहावयास लागले. या दाम्पत्याला एक मूलही झाले. मात्र काही वर्षांनी या दोघांमध्ये कमालीचा वाद उद्भवल्याने २००७ साली सुरजित सिंह याने मनप्रीतपासून वेगळे राहण्यास सुरुवात केली. तसेच कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला. घटस्फोट मिळविण्याची घाई असलेल्या सुरजित सिंहने पत्नीचे मन वळवून आम्हाला सहमतीने घटस्फोट मिळवायचा आहे. आमच्यात झालेल्या करारानुसार आमचा मुलगा मनप्रीतकडेच राहील. त्याबदल्यात आपण मनप्रीतला २ लाख रुपये देणार आहोत, अशा आशयाचे हमीपत्रच कुटुंब न्यायालयात दाखल केले. दोघांच्या सहीने दाखल करण्यात आलेल्या या हमीपत्रासोबत लग्नाच्या वेळी काढलेली छायाचित्रे, दोघांची ओळख पटविणारी कागदपत्रे सोबत जोडली.

 

एवढेच नव्हे तर, या जोडप्याने अनेक वेळा या न्यायालयात हजेरीही लावली आणि अखेर २२ एप्रिल २००८ रोजी घटस्फोटही मिळवला. आपल्या मनासारखे झाल्याने सुरजित सिंह निश्‍चिंत असतानाच मनप्रीतने त्याला जोरदार धक्का दिला. घटस्फोटासाठी आपण कधीही अर्ज केेलेला नाही. मी कधीही न्यायालयात हजर राहिलेले नाही. तसेच घटस्फोटाच्या कोणत्याही कागदपत्रावर आपण कधीही कोणतीही सही केलेली नसल्याने सुरजित सिंह आणि आपल्यामध्ये झालेल्या घटस्फोटाचा निर्णय रद्दबातल ठरवावा, अशी मागणी करणारा अर्जच मनप्रीतने कुटुंब न्यायालयात दाखल केला. न्यायालयाची दिशाभूल करण्याचा हा प्रकार ‘गंभीर गुन्हा’ हेाता. ही बाब लक्षात घेऊन कुटुंब न्यायालयाने हा बोगस घटस्फोट रद्दबातल ठरवला.