www.24taas.com, नवी दिल्ली
माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलामच राष्ट्रपतीपदाचे क्रमांक एकचे उमेदवार आहेत. आमचे उमेदवार कलाम आहे. यावर सर्वांनी एकमत करावे, असे सांगून तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना शिंगावर घेतले आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात ममता बॅनर्जी यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या. कलाम हे आमचे उमेदवार आहेत, त्यांनी निवडणुक लढवावी. ते जिंकून येणारे उमेदवार आहेत. आम्ही आमचा उमेदवार निवडला आहे. इतरांनी यावर विचार करावा, असेही ममता यांनी स्पष्ट केले आहे.
यूपीएची या संदर्भात बैठक आहे की नाही, मला माहित नाही, असेही ममता यांनी सांगितले.
केंद्रातील यूपीए सरकारमधून बाहेर पडणार नाही किंवा सरकार पाडणार नाही, असे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रपती निवडणुकीबाबत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांच्याशी भेट करण्यापूर्वी ममतांनी हे स्पष्ट केले आहे.
मी सरकार पडण्याचे कारण बनणार नाही, असे ममता यांनी सांगितले. विशेष म्हणजे राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी यूपीएची उद्या म्हणजे शुक्रवारी बैठक होणार आहे.
दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी चर्चेचे दरवाजे खुले असल्याचे आणि नाववर एकमत होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, स्वतः काँग्रेसला प्रणवदा राष्ट्रपती म्हणून मान्य नसल्याचा गौप्य स्फोटही यादव यांनी केला. त्यांना जर राष्ट्रपती बनवायचे असते तर त्यांनी केवळ त्यांचेच नाव पुढे केले असते. आम्ही कोणत्याही नाववर अडून बसलेलो नाही,