सबसिडी कपातीसंदर्भात घटक पक्षांचे सहकार्य घेऊ-पंतप्रधान

पंतप्रधानांनी अर्थव्यवस्थेच्या सर्वसमावेशक वाढीसाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या दोन टक्के इतकी सबसिडीत कपात करण्याशिवाय पर्याय नसल्याचं म्हटलं आहे.

Updated: Mar 16, 2012, 03:38 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली


अर्थव्यवस्थेच्या सर्वसमावेशक वाढीसाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या दोन टक्के इतकी सबसिडीत कपात करण्याशिवाय पर्याय नव्हता असं समर्थन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी  केलं आहे. संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यांनी याबाबतीत आपलं मत व्यक्त केलं आहे.

 

अर्थमंत्री प्रणव मुखर्जींनी २०१२-१२ चा अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केलेल्या सबसिडी कपाती संदर्भात सरकारसमोर पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतीं नियंत्रणात ठेवणं हे मोठं आव्हान असं पंतप्रधान  म्हणाले. कठोर निर्णय घेण्याशिवाय पर्याय नसल्याचं आणि सबसिडीत कपात करण्याच्या दुसरा कोणताही मार्ग नसल्याचं पंतप्रधांनांनी सांगितलं आहे.

 

या प्रस्तावाला सरकारच्या सहयोग पक्षांचा पाठिंबा मिळेल का असं विचारलं असता त्याच्यांशी चर्चा करुन त्यांना बरोबर घेऊनच मार्ग काढावा लागेल असं ते म्हणाले.

 

जगभरातल्या इतर देशांच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत आपल्या अर्थव्यवस्थेने विकासाचा दर कायम राखला ही सरकारची मोठं यश असल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्या जगात विकासाची गती राखण्यात आपण आघाडीवर आहोत आणि वेगवान, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासावर पंतप्रधानांनी भर दिला.