www.24taas.com, नंदूरबार
नंदूरबार जिल्ह्यात एका कुटुंबाला गावक-यांनी डाकिण ठरवलं. गावात झालेल्या तीन मृत्यूसाठीही वसावे कुटुंबाला जबाबदार ठरवत त्यांच्या मुलावर विष प्रयोग करण्याचा धक्कादायक प्रकारही करण्यात आला. मागील सहा महिन्यांपासून वेरी गावातल्या वेसावे कुटुंबाला डाकिण ठरवून अत्याचार सुरू आहेत.
अक्कलकुवा तालुक्यातल्या वेरी गावात तीन जणांचा वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यू झाला होता. मात्र त्या मागे मोहत्या वसावे कुटुंब असल्याचा संशय गावक-यांनी व्यक्त केला. परिणामी या कुटुंबातल्या सहा जणांना सहा महिन्यांपूर्वी मारहाण करण्यात आली होती.
मात्र आता तर या कुटुंबाला पंचांसमोर मारहाण करत भरत वसावे याला विष पाजून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने त्याला जिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आल्यानं त्याचा प्राण वाचला. वसावे कुटुंबानं या प्रकरणी पोलिसांकडे दोनदा तक्रार केली होती. मात्र त्याकडे लक्ष न दिल्यानं वसावे कुटुंबानं दुस-या गावात आश्रय घेतला होता. मात्र तिथंही निभाव न लागल्यानं त्यांना पुन्हा मूळगावी परतावं लागलं. एकविसाव्या शतकातही डाकीण, भूत यांचं मनावरील गारूड अजून कायम आहे. परिणामी या विरोधात मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे.
व्हिडिओ पाहा..
[jwplayer mediaid="99448"]