झी २४ तास वेब टीम, राळेगणसिद्धी
हिसारमध्ये लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसविरोधी प्रचार करण्यावरून झालेले मतभेद आणि टीकेनंतर अण्णा हजारेंनी पाच राज्यात होणा-या अगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाचं नाव न घेता प्रचार करण्याचं ठरवलंय. विधानसभा निवडणुकीत अण्णा प्रचार जरूर करतील पण कोणत्याही पक्षाचं नाव न घेता स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन ते मतदारांना करणार आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग यांना लिहिलेल्या पत्रात अण्णांनी ही माहिती दिलीय. हरियाणातल्या हिसारमध्ये लोकसभेच्या पोटनिवडणुकीत अण्णांनी काँग्रेसविरोधी प्रचार केला होता. तिथं काँग्रेस उमेदवाराचं डिपॉझिटही जप्त झालं होतं. पण या निर्णयामुळे टीम अण्णांमधले काही सदस्य तसेच अन्य स्तरावरूनही टीका झाली होती. या वादग्रस्त भूमिकेनंतर हिसारचा धडा घेऊन अण्णांनी निवडणुकीबाबत आता नवी भूमिका जाहीर केलीय.त्यामुळे अण्णांचा काँग्रेसविरोध मावळल्याचं मानलं जातंय.