दुष्काळाची कुऱ्हाड, बळीराजाच्या पशुधनावर!

शेतीनंतर शेतक-यांचं जगण्याचं दुसरं साधन म्हणजे त्यांच्याजवळचं पशुधन...पण दुष्काळाची छाया या पशुधनावरही पडलीय. सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी पट्ट्यात माणसांना प्यायला पाणी नाही तर जनावरांना कुठून देणार... त्यामुळे पोटच्या लेकरांप्रमाणे जपलेल्या या जनावरांना कसायाच्या हाती देतांना शेतक-यांचा जीव तुटतोय...

Updated: Apr 22, 2012, 11:52 AM IST

www.24taas.com, नितीन पाटोळे, सातारा

शेतीनंतर शेतक-यांचं जगण्याचं दुसरं साधन म्हणजे त्यांच्याजवळचं पशुधन...पण दुष्काळाची छाया या पशुधनावरही पडलीय. सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी पट्ट्यात माणसांना प्यायला पाणी नाही तर जनावरांना कुठून देणार... त्यामुळे पोटच्या लेकरांप्रमाणे जपलेल्या या जनावरांना कसायाच्या हाती देतांना शेतक-यांचा जीव तुटतोय...

ही जनावरं कुठे चरायला निघालेली नाहीत....तसच ती गोठ्याकडेही परतत नाहीयेत...तर ती चालली आहेत कसायाच्या दिशेनं. त्यांचं नशीब चांगलं असेल तर कदाचित त्यांचा धनी त्यांना बाजारात नेईलही....पण परिणाम एकच...ही जनावरं आणि त्याच्या धन्याची कायमची ताटातूट...

सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातल्या बहुतांश शेतक-यांची हीच अवस्था...यातही ज्या शेतक-यांनी जनावरं ठेवली आहेत त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. महिनोन महिने ओला चारा या जनावरांनी पाहिलेला नाही...

सुकलेला चारा खाऊन त्याचं शरीरही सुकत चाललीयेत. मुक्या जीवांची वेदना शेतक-यांना का कळत नाही ? पण ते तरी काय करणार..नियतीनं त्यांच्यापुढे जे काही वाढून ठेवलय ते स्विकारण्याशिवाय दुसरा पर्यायच त्यांच्यासमोर उरलेला नाही.

दुष्काळ पडणार हे या शेतक-यांनी आधीच जाणलं होतं. ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसानं दगा दिला आणि तिथूनच दुष्काळाची चाहूल बळीराजाला लागली. दुष्काळाचे सर्वाधिक परिणाम या मुक्या जीवांनाच भोगावे लागतायेत. कारण त्यांना माणसाप्रमाणे आपलं दु:ख सांगता येत नाही. धन्यानं दिलं तर दिलं नाहीतर बाजारात विकलं..तर.दाद कुणाकडे मागणार ? माणसांच्या बाबतीत बेफिकीर असणारी यंत्रणा जनावरांकडे लक्ष देईल अशी अपेक्षाच करणं धाडसाचं ठरेल.

Tags: