प्रवाशांच्या संतापापुढे रेल्वेयंत्रणा नतमस्तक, अखेर प्रवाशांना सेवा द्यावी लागली...

अखेर उकाड्याने हैराण प्रवाशांचा संयम सुटला आणि त्यांनी मनमाड स्टेशनवर १ तासभर गाडी रोखून धरली.

Updated: May 13, 2019, 08:50 PM IST
प्रवाशांच्या संतापापुढे रेल्वेयंत्रणा नतमस्तक, अखेर प्रवाशांना सेवा द्यावी लागली... title=

नीलेश वाघ, झी मीडिया, मनमाड : मुंबई-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस संतप्त प्रवाशांनी मनमाड स्टेशनला तासभर रोखून धरली होती. गाडीची वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने प्रवासी उकाड्याने हैराण होते. अखेर उकाड्याने हैराण प्रवाशांचा संयम सुटला आणि त्यांनी मनमाड स्टेशनवर १ तासभर गाडी रोखून धरली.राज्यात उन्हाचा कडाका वाढलाय, यात वातानुकूलित डब्याची यंत्रणा बंद पडल्याने, प्रवाशांना प्रचंड त्रास होता. मनमाड स्टेशनवर गाडी आल्यानंतर प्रवासी संतप्त झाले. 

जोपर्यंत एसी दुरूस्त होत नाही, तोपर्यंत गाडी रोखून धरणार असल्याचा निश्चिय प्रवाशांनी केला. यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली, यापूर्वी त्यांनी प्रवाशांच्या तक्रारीकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

प्रवासी गाडी हलू द्यायला तयार नाहीत, आणि गाडी एक तासापासून स्टेशनवर थांबून असल्याने रेल्वे प्रशासनाने, वातानुकूलित यंत्रणा दुरूस्ती सुरू केली. अखेर एसी दुरूस्त झाल्यानंतर प्रवासी गाडीत बसले. यानंतर ही मुंबईकडून मनमाडला आलेली गाडी वाराणसीच्या दिशेने रवाना झाली, आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.