'महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला दिशा दाखवली...' रवींद्र धंगेकरांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Politics : कसब्याच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. सलग 28 वर्षं भाजपच्या ताब्यात असलेला कसब्यासारखा मतदारसंघ जिंकल्यानं आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना दहा हत्तींचं बळ आलंय. कसब्याची विधानसभा पोटनिवडणूक (Kasba By Election) जिंकल्यानं महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) आत्मविश्वास वाढलाय. रवींद्र धंगेकर यांचा 9 मार्चाला शपथविधी होणार आहे. त्यापूर्वी धंगेकर यांनी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. काँग्रेस, शिवसेना नेत्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या.

Mar 08, 2023, 14:22 PM IST
1/6

कसबा पेठ (Kasbapeth) तब्बल 28 वर्षं भाजपच्या  (BJP) ताब्यात असलेला विधानसभा मतदारसंघ. काँग्रेसच्या (Congress) रवींद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) भाजपच्या हेमंत रासनेंना (Hemant Rasane) तब्बल 10 हजार 915 मतांनी पराभूत करून भाजपचा हा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. या विजयानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात धंगेकरांचीच चर्चा सुरु झालीय.

2/6

आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर विरोधक एकत्र झाले तर जिंकू शकतात. 30 वर्षे भाजपाचा बालेकिल्ला भुईसपाट करून रवींद्र धंगेकरांनी आपण जिंकू शकतो हा विश्वास केवळ पुण्याला नाही, तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला दिला. तसेच पुढील दिशा दाखवली, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

3/6

धंगेकर पराक्रम गाजवून आले. ते पूर्वी पुण्याचे नगरसेवक होते. मला आनंद आहे की माझा माणुस आमदार झालाय. या निवडणुकीने दाखवले की कॅाग्रेस राष्ट्रवादी सोबत होती. एकत्रित लढलो तर काय होते हे दाखवून दिलं असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

4/6

त्याआधी धंगेकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट त्यांच्या बंगळुरुमधल्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत खरगे यांनी कसाब पोटनिवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल धंगेकर यांचं अभिनंदन केलं. दोघांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली.

5/6

रवींद्र धंगेकर आज संध्याकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी रवींद्र धंगेकर मनसेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते. ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जात. त्यामुळे राज ठाकरेंबरोबरची भेटही महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

6/6

रवींद्र धंगेकर हे सुरुवातीला शिवसेना आणि त्यानंतर मनसेत होते. 2019 मध्ये त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सर्वच पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांशी त्यांचे चांगले संबंध प्रस्तापित झाले आहेत. यामुळेच शपथविधीपूर्वी धंगेकर सर्व पक्षनेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. दरम्यान 9 मार्चला रवींद्र धंगेकर आमदार पदाची शपथ घेणार आहेत.