1/7
बोटींची शर्यत
स्नेक बोटींची शर्यंत हे या सणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. या शर्यतीला ‘अर्नामुल्ला वल्लामकली’ असं म्हटलं जातं. सणाच्या पाचव्या दिवशी पंपा नदिच्या काठावर या शर्यतींचं आयोजन केलं जातं. वेगवेगळ्या पद्धतींनी सजवल्या गेलेल्या जवळजवळ ५० बोटी या शर्यतीत सहभाग घेतात. यावेळी वल्हेकरी गाणीही म्हणतात या पारंपरिक गाण्यांना ‘वंचिपट्टू’ असं म्हणतात. पर्यटकांसाठीही या शर्यती अतिशय आकर्षक ठरतात त्यामुळेच केरळ सरकारकडूनही या शर्यतींना प्रोत्साहन मिळतं.
2/7
तिरुओनमचा उत्साह
पुरुष, स्त्रिया, लहान मुलं सगळेच नवीन कपडे परिधान करून हा दिवस साजरा करतात. ठिकठिकाणी सामूहिक नृत्याचं आयोजन केलं जातं. ‘तिरुओनम’ हा ओनमचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी महाबळी राजा पातळातून पृथ्वीवर येतो, असं समजलं जातं. या दिवशी सगळे खाद्यपदार्थ शुद्ध शाकाहारी असतात. कमीत कमी ११ वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ ताटात दिसतात. (कधीकधी पदार्थांचा हा आकडा ६४ वरसुद्धा जातो). जेवणाचं आणखी एक विशेष म्हणजे हे सगळे पदार्थ केळ्याच्या पानांत वाढले जातात. त्यामुळे या जेवणाची मजा काही औरच
3/7
पारंपरिक वस्त्रांचं महत्त्व
‘थिरुओनम’मध्ये पारंपरिक वस्त्रांना खूप महत्त्व आहे. त्याला ‘ओनाक्कोडी’ असं म्हणतात. ही ओनाक्कोडी कुटुंबातील सर्वांत वयोवृद्ध महिलेच्या हातून कुटुंबातील सर्व सदस्यांना दिली जाते. महिला पांढऱ्या रंगाची सोनेरी किनार असलेली साडी परिधान करतात तर पुरुष पांढऱ्या रंगाचा ‘मुंदू’ परिधान करतात. यावेळी जवळच्या नातेवाईकांनाही नवीन कपडे आणि शुभेच्छा दिल्या जातात.
4/7
रंगांची उधळण
ओनमची आणखी एक ओळख म्हणजे फुलांनी रेखाटली जाणारी रांगोळी. ताज्या आणि सुवासिक फुलांची रांगोळी या दिवशी आपल्याला ठिकठिकाणी दिसते. त्याला ‘पुक्कलम’ असं म्हटलं जातं. फुलांच्या रांगोळीच्या मधोमध दिवा पेटवला जातो. लाल, पिवळा आणि काळ्या रंगाच्या वाघाचे पट्टे रेखाटलेले वस्त्र परिधान केलेले नृत्य कलाकार ड्रम्सच्या तालावर ‘पुलिकली’ सादर करतात. ‘तिरुवथिक्कली’ हा नृत्याचा वेगळा आणि पारंपरिक प्रकारही इथं पाहायला मिळतो.
5/7
भव्य सोहळा...
‘अथाचमयन’ हा या सणातील अत्यंत महत्त्वाचा भाग... ‘ओनम’चा पहिला दिवस ‘अथम’ म्हणून ओळखला जातो.
सजलेले हत्ती, छोट्या-मोठ्या बोटी, संगीत, पारंपरिक लोकनृत्य आणि वेगवेगळ्या कलांसोबत हा सण विविध रंगांत उजळून निघतो. त्यामुळेच राज्याच्या सांस्कृतिक समृद्धीला अधोरेखित करणारा हा सण ठरतो. ‘तिरिक्काक्करा’ मंदिरापासून भव्य यात्रेला सुरुवात होते. ही यात्रा म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच ठरते. केरळ शासनाचाही या यात्रेमध्ये मोठा सहभाग असतो.
6/7
का साजरा करतात ‘ओणम’...
‘महाबळी (मावेळी) राजा’ घरी परतल्याच्या निमित्तानं साजरा होणा-या या सणाला हिंदू सणांमध्ये महत्त्वाचं स्थान आहे.
‘प्रल्हादाचा नातू आणि असूर जातीत जन्मलेला महाबळी... एक उदार राजा तसंच भगवान विष्णूचा महान भक्त म्हणून ओळखला जातो. महाबळीच्या भीतीनं इंद्रानं विष्णुला साकडं घातलं. त्यावरून विष्णूनं ‘वामना’चा (विष्णुचा पाचवा अवतार) धारण करून महाबळी राजाला तीन पावलं जमीन मागितली. विराट रुप धारण करून पहिल्या दोन पावलांत वामनानं स्वर्ग आणि पृथ्वी हस्तगत केली. दिलेल्या वचनानुसार विष्णुला तिसरं पाऊल टाकण्यासाठी महाबळी राजानं आपलं शिर वामनाच्या समोर ठेवलं. वामनानं तिस-या पावलात महाबळीला पाताळात ढकललं. पण, महाबळीवर खुश झालेल्या विष्णुनं त्याला वर्षातून एकदा जमिनीवर येऊन आपल्या जमिनीला आणि लोकांना भेटण्याचं वरदान दिलं’ अशी ही आख्यायिका सांगितली जाते.
7/7