Babies Born On 22 January 2024: उत्तर प्रदेशमधील अयोध्येमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अयोध्येत जोरदार तयारी सुरु असतानाच दुसरीकडे खास याच दिवशी आपली प्रसूती करावी अशी मागणी करणाऱ्या गर्भवती महिलांची संख्याही देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये लक्षणीय असल्याची बातमी नुकतीच समोर आली. अनेक महिलांनी तर याच तारखेला बाळाला जन्म देण्यासाठी वाटेल ते करण्याची इच्छाही डॉक्टरांना बोलून दाखवली आहे. मात्र खरोखरच 22 जानेवारी 2024 ला जन्माला आलेली मुलं नक्की कशी असतील? त्यांच्या जन्माचा दिवस त्यांच्याबद्दल काय सांगतो याबद्दलही प्रचंड उत्सुकता आहे. याचसंदर्भात जाणून घेऊयात...
22 जानेवारी रोजी चंद्र वृश्चिक राशीत असेल. मंगळ, शुक्र आणि बुध धनू राशीच असतील. त्याचप्रमाणे सूर्य मकर आणि शनी कुंभ राशीत असणार आहे. राहू मीन आणि गुरु मेष राशीत विराजमान असतील. 22 हा जन्म तारीख असलेल्या मुलांचा जन्मअंक 04 आणि भाग्यांकही 04 असणार. हा फार दुर्मिळ योग आहे असं सांगितलं जातं. 04 क्रमांकाचा स्वामी ग्रह राहु, शनी आहे. तसेच हा बुधचा मित्र अंक आहे. 04 जन्मांक व भाग्यांक असलेली मुलं फारच भाग्यवान असतात. ही मुलं धर्माच्या क्षेत्रात फार मोठं काम करतात असं मानलं जातं. ही मुलं फार विद्वान आणि प्रभावशाली असतात. अशी मुलं उत्तम नेते होऊ शकतात किंवा प्रशासनामध्ये मोठ्या पदावर विराजमान होऊ शकतात.
22 जानेवारीला चंद्र शुक्राच्या वृष राशीत असणार आहे. शुक्र हा ग्रह चित्रपट, ग्लॅमरच्या जगावर वर्चस्व असलेला मानला जातो. शनी हा न्यायाचा ग्रह असून त्याला विधीसंदर्भात संपूर्ण कल्पना असते. मंगळ आणि सूर्य आरोग्य आणि दिर्घायुष्य देणारे आहेत. सूर्य वडिलांना धनवान बनवणारे असेल तर चंद्र वृश्चिकचा असून या तारखेला जन्माला येणारी बाळं आईसाठीही फार भागव्यवान असतील. बाळाच्या जन्माच्या एका वर्षाच्या आत त्याच्या आई-वडिलांना नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळेल. गाडी घेण्याची संधीही चालून येईल.
22 जानेवारी रोजी जन्माला येणारी मुलं कुशाग्र बुद्धीमत्तेची असतील. ही मुलं गणपतीची भक्ती करतील. भगवान श्री रामाचीही ते भक्ती करतील. प्रभू रामांबरोबरच भगवान विष्णूचीही त्यांच्यावर विशेष कृपा असेल. ही मुलं धर्माच्या मार्गावर चालणारी आणि सत्य बोलणारी असतील.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)