भाऊबीजेला जुळून आलाय शुभ योग; यंदा औक्षणासाठीचा शुभ मुहूर्त कोणता? जाणून घ्या

Bhai Dooj 2023 Puja Tilak Mahurat: दिवाळीच्या दिवसांतील महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहिण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 3, 2023, 06:06 PM IST
भाऊबीजेला जुळून आलाय शुभ योग; यंदा औक्षणासाठीचा शुभ मुहूर्त कोणता? जाणून घ्या title=
Bhaiya Dooj 2023 When is Bhai Dooj Know the correct date and muhurt

Bhai Dooj 2023: दिवाळी एका आठवड्यावर येऊन ठेपली आहे. दिवाळीच्या दोन दिवसांनंतर देशभरात भाऊबीज साजरी केली जाते. भावा-बहिणीचे नाते हे खास असते. रक्षाबंधनप्रमाणेच भाऊबीजेलाही खास महत्त्व असते. या दिवशी भावाला ओवाळून त्याला टिळा लावणे याला अधिक महत्त्व असते. बहिण भावाच्या दीर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते. ही प्रथा गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आली आहे. पंचांग आणि शास्त्रीय नियमांनुसार भाऊबीज साजरा करण्याचा योग्य मुहूर्त, महत्त्व जाणून घेऊया. 

भाऊबीज का साजरी केली जाते?

पौराणिक मान्यतेनुसार, यमदेव एकदा आपली बहिण यमुनेच्या घरी भोजन करण्यासाठी गेले होत. यमुनेने यमराजाना प्रेमाने ओवाळले होते. तेव्हा वरदान म्हणून यमराजांनी त्यांना सांगितले होते की, यमद्वितीयाच्या दिवशी म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी जे भाऊ बहिणींच्या घरी येतात आणि बहिणींची पूजा स्वीकारतात आणि त्यांच्या हाताने तयार केलेले अन्न खातात, त्यांना अकाली मृत्यूची भीती वाटत नाही. त्यामुळं यमद्वितीयेला अधिक महत्त्व आहे. 

यंदा भाऊबीज कधी आहे?

यंदा भाऊबीज दोन दिवस साजरी केली जाणार आहे. 14 आणि 15 नोव्हेंबर 2023 या दोन्ही दिवशी बहिणी भावाला ओवाळू शकतात. पंचांगानुसार, भाऊबीजेचा मुहूर्त 14 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजून 36 मिनिटांनी सुरू होणार असून 15 नोव्हेंबर 2023 ला 1 वाजून 47 वाजता संपणार आहे. 

14 नोव्हेंबर 2023 रोजी का साजरी केली जाणार भाऊबीज? 

पंचागानुसार, भाऊबीजेचा मुहूर्त 14 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी ते दुपारी 3 वाजून 19 मिनिटांपर्यंत आहे. यंदा भाऊबीजेच्या दिवशी शोभन योगदेखील येणार आहे. मान्यतेनुसार, हा मुहूर्त शुभ व फलदायी मानला जातो. 

15 नोव्हेंबर रोजी का साजरी केली जाणार भाऊबीज?

हिंदू धर्मानुसार कोणताही सण उदया तिथी असल्यावरच साजरा केली जातो. अशातच उदया तिथीनुसार भाऊबीजेचा सण 15 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाईल. या दिवशी भावाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी ते दुपारी 12 वाजून 05 मिनिटांपर्यंत आहे.

हिंदू धर्मात भाऊबीज हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. असं म्हणतात की, यामुळं भावा-बहिणीचे एकमेकांप्रती प्रेम वाढते. या दिवशी बहिण तिच्या भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावून त्याला ओवाळतात. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )