Mokshada Ekadashi 2022: मोक्षदा एकादशीला शुभ योग, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

Mokshada Ekadashi 2022: हिंदू धर्मातील पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात शुक्ल आणि कृष्ण पक्ष येतो. प्रत्येक पंधरवड्यातील एकादशीला विशेष महत्त्व आहे. त्याच मोक्षदा एकादशीचं महत्त्व विशेष आहे. या दिवशी व्रत, पूजा विधी केल्याने मोक्ष मिळतो, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.

Updated: Dec 2, 2022, 01:11 PM IST
Mokshada Ekadashi 2022: मोक्षदा एकादशीला शुभ योग, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व title=

Mokshada Ekadashi 2022: हिंदू धर्मातील पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात शुक्ल आणि कृष्ण पक्ष येतो. प्रत्येक पंधरवड्यातील एकादशीला विशेष महत्त्व आहे. त्याच मोक्षदा एकादशीचं महत्त्व विशेष आहे. या दिवशी व्रत, पूजा विधी केल्याने मोक्ष मिळतो, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशी 3 डिसेंबर 2022 रोजी शनिवारी येत आहे. यंदा मोक्षदा एकादशीला शुभ योगही जुळून आला आहे. या दिवशी गीता जयंती देखील आहे. याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धभूमी कुरुक्षेत्रात गीता सांगितली होती. गीता जयंतीला व्रत आणि गीता पठण केल्याने मनुष्याचा जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती होते, अशी समज आहे. या दिवशी भगवान विष्णुच्या शंख, चक्र, गदाधारी चतुर्भुज स्वरुपाचं पूजन करावं. त्याचबरोबर विष्णु सहस्रनाम आणि नारायण कवच पठण करावं. यामुळे हजारो यज्ञ केल्याचं फळ मिळतं. 

मोक्षदा एकादशीला रवि योग

या वर्षी मोक्षदा एकादशीला शुभ योग जुळून आला आहे. या दिवशी रवि योग असल्याने महत्त्व वाढलं आहे. या योगात केलेल्या पूजेला विशेष फळ मिळतं. असं असताना दुसरीकडे, एकादशीला भद्रा आणि पंचक पण आहे. भद्रा काळ 3 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजून 33 मिनिटांपासून 4 डिसेंबरला सकाळी 5 वाजून 34 मिनिटांपर्यंत असेल. 

मोक्षदा एकादशी शुभ मुहूर्त

मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 3 डिसेंबर (शनिवारी) सकाळी 5 वाजून 39 मिनिटांनी सुरु होईल आणि 4 डिसेंबर (रविवारी) सकाळी 5 वाजून 34 मिनिटांपर्यंत असेल. सूर्योदयाची वेळ सकाळी 6 वाजून 57 मिनिटांनी आहे. दुसरीकडे संध्याकाळी भद्रा काळ सुरु होणार आहे. त्यामुळे भद्राकाळ सुरु होण्यापूर्वी पूजा करा. 4 डिसेंबरला उपवास सोडताना संपूर्ण दिवस सर्वार्थ सिद्धि योग आहे. पण पारण शुभ वेळ 4 डिसेंबरला सकाळी 7 वाजून 5 मिनिटांपासून 9 वाजून 9 मिनिटांपर्यंत असेल. पारणानंतर दान-दक्षिणा द्यावी. यामुळे सर्वार्त सिद्धि योगाचं पूर्ण फळ मिळेल. 

बातमी वाचा- December Birth: डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो, जाणून घ्या

मोक्षदा एकादशीला या बाबी लक्षात ठेवा

मोक्षदा एकादशीला भगवान विष्णुंची पूजा केल्यानंतर एकादशीची कथा जरूर ऐकावी. त्याचबरोबर विष्णु सहस्रनामाचा पाठ करावा. त्यानंतर विष्णुची आरती करून कमीत कमी 108 वेळ भगवान विष्णुंच्या बीज मंत्राचा जप करावा. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)