IND vs SA Final: पडद्यामागे बरंच काही घडतं...; टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्माचं सूचक विधान

IND vs SA Final T20 World Cup 2024: वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, गेल्या 3-4 वर्षांमध्ये मी जे काही अनुभवलं ते आता शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. खरं सांगायचे तर, आम्ही वैयक्तिकरित्या आणि एक संघ म्हणून खूप मेहनत घेतली आहे.

सुरभि जगदीश | Updated: Jun 30, 2024, 07:13 AM IST
IND vs SA Final: पडद्यामागे बरंच काही घडतं...; टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्माचं सूचक विधान title=

IND vs SA Final T20 World Cup 2024: अखेर शनिवारी रात्री कोट्यावधी भारतीयांचं स्वप्न पूर्ण झालं. टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपवर दुसऱ्यांदा नाव कोरलं. यंदाच्या वेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 रन्सने पराभव केला आणि चाहत्यांना खूश केलं. वर्ल्डकप विजयानंतर रोहितसह टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंचे डोळे पाणावले होते. शिवाय रोहित आणि विराट यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा देखील केला. या ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माने, या क्षणाची सर्व भारतीय वाट पाहत होते असं म्हटलंय.

विजयानंतर काय म्हणाला रोहित शर्मा? 

वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, गेल्या 3-4 वर्षांमध्ये मी जे काही अनुभवलं ते आता शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. खरं सांगायचे तर, आम्ही वैयक्तिकरित्या आणि एक संघ म्हणून खूप मेहनत घेतली आहे. या ठिकाणी पोहोचण्यासाठी आणि हा गेम जिंकण्यासाठी पडद्यामागे बरेच काही घडलंय. हे आम्ही आज तर गेली 3-4 वर्षांपासून करत असून त्याचा आज हा परिणाम मिळाला आहे. आम्ही याआधी अनेक हाय प्रेशर सामने खेळले आहेत. यावेळी खेळाडूंना काय करावं लागेल हे त्यांना माहिती असतं.

मला माझ्या खेळाडूंवर गर्व आहे- रोहित शर्मा

रोहित पुढे म्हणाला, 'सर्व खेळाडूंनी एक टीम म्हणून एकत्र काम केलंय. आम्हाला हे जिंकायचं होतं. पडद्यामागे बरेच काही घडते, अशी स्पर्धा जिंकण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. माझ्यासोबत खेळणाऱ्या खेळाडूंचा मला खूप अभिमान आहे. याशिवाय मॅनेजमेंटचा देखील मला अभिमान आहे ज्याने आम्हाला खेळण्याचं, प्रदर्शन करण्याचे स्वातंत्र्य दिलं आणि आमच्यापैकी प्रत्येकावर विश्वास ठेवला. याची सुरुवात व्यवस्थापन, प्रशिक्षक, कर्णधार यांच्यापासून होतं आणि मग खेळाडू मैदानावर जाऊन कामगिरी करतात.

विराटच्या फॉर्मबद्दल रोहितचं मोठं विधान

अखेर फायनलच्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची बॅट तळपली. त्याच्या या खेळीवर रोहित शर्मा म्हणाला, मला वाटतं की, आम्ही संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. विराटच्या फॉर्मवर कोणालाही शंका नव्हती. आम्हाला माहित आहे की, तो किती सक्षम आहे, तो 15 वर्षांपासून त्याच्या खेळात अग्रस्थानी आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा मोठे खेळाडू उभे राहतात. या सामन्यात विराटने विराटने एक टोक पकडलं होतं जे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरलं. या अशा विकेट नाहीत जिथे तुम्ही मुक्तपणे फलंदाजी करू शकता. विराटचा अनुभव या ठिकाणी कामी आला. बाकीचे खेळाडूही खूप चांगले खेळले, अक्षरची 47 धावांची खेळीही खूप महत्त्वाची होती.

चाहत्यांना रोहितकडून खास सलाम

'मी त्यांच्यापैकी एक आहे ज्यांनी बुमराहला इतक्या वर्षांपासून पाहिलंय. त्यांच्यासोबत मी खेळलो देखील आहे. बुमराहने त्याच्या कौशल्यांचा आधार घेतला आहे जे पुरेसे आहे. त्याला जे काही करायचंय ते तो पूर्णत्वाने करतो. जसप्रीत बुमराहबद्दल एका शब्दात, तो एक क्लास ॲक्ट आहे. हार्दिकही उत्तम आहे, शेवटची ओव्हर टाकणं, कितीही धावा आवश्यक असल्या तरी कठीणच राहत. न्यूयॉर्कपासून बार्बाडोसपर्यंत, मला फक्त चाहत्यांना सलाम करायचा आहे. त्यांनी आम्हाला ज्या प्रकारे साथ दिली आणि भारतातही लाखो लोक बसून पाहत आहेत. भारतात रात्र झाली आहे, मला खात्री आहे की, ते सामना पाहत आहेत. आमच्यासारखेच ते खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. हा विजय त्यांच्यासाठी आहे. आज आम्ही जे काही मिळवले आहे त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे.