मुंबई : जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणजे बीसीसीआय. पण याच बीसीसीआयची वेबसाईट बंद झाल्याची नामुष्की ओढावली. वेबसाईटचं नुतनीकरण न केल्यामुळे बीसीसीआयची वेबसाईट बंद झाली होती.
बीसीसीआयनं वेबसाईटसाठी खरेदी केलेल्या डोमेनची वैधता २ फेब्रुवारी २००६ ते २ फेब्रुवारी २०१९ पर्यंत आहे. वेबसाईटचं नुतनीकरण करण्याची शेवटची तारीख ३ फेब्रुवारी २०१८ होती. पण बीसीसीआयनं हे नुतनीकरण न केल्यामुळे वेबसाईटचं बंद पडली होती. अखेर ही वेबसाईट सुरु करण्यात आली. पण सेंच्युरिअनमध्ये भारत-दक्षिण आफ्रिकेमध्ये मॅच सुरु असताना ही वेबसाईट बंद होती.
वेबसाईटची नोंदणी करणाऱ्या register.com आणि namejet.com यांनी बीसीसीआयच्या डोमेनच्या नावासाठी बोली लावायलाही सुरुवात केली होती. या डोमेन नावाला ७ बोलीही मिळाल्या होत्या. २०१०मध्ये आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदींनी हे डोमेन विकत घेतले होते.
बीसीसीआयला आयसीसीकडून ४०५ मिलियन यूएस डॉलर्स मिळतात तर आयपीएल प्रसारणाचे हक्क स्टार स्पोर्ट्सला २.५५ बिलियन यूएस डॉलरला देण्यात आले. एवढा पैसा असूनही नुतनीकरण न केल्यामुळे वेबसाईट बंद पडल्याची नामुष्की बीसीसीआयवर ओढावली होती.