अरेरेरे...पुढे आला आणि घात झाला; लॅथमला ती चूक पडली महागात

अक्षर पटेलनेही चांगली गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या खेळाडूंना नाकीनऊ आणले.

Updated: Nov 28, 2021, 07:53 AM IST
अरेरेरे...पुढे आला आणि घात झाला; लॅथमला ती चूक पडली महागात

कानपूर : टीम इंडिया कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळतेय. विराट कोहलीला पहिल्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणे कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी उत्तम प्रकारे पुनरागमन केलंय. यावेळी अक्षर पटेलनेही चांगली गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या खेळाडूंना नाकीनऊ आणले.

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी गोलंदाजी केली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा डाव फसला आणि अक्षर पटलने किवी संघाला मोठा धक्का दिला. त्या दिवशी न्यूझीलंडच्या डावाचा मुख्य सूत्रधार असलेल्या टॉम लॅथमला त्याने बाद केलं. लॅथम 95 धावा करून अक्षर पटेलचा बळी ठरला.

तेव्हा लॅथम अतिशय उत्तम आणि चोख फलंदाजी करत होता, पण त्याने अक्षर पटेलचा चेंडू पुढे करून खेळण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचठिकाणी त्याने चूक केली. विकेटमागे कीपिंग करणार्‍या केएस भरतनेही कोणतीही चूक न करता स्टंप उडवले. लॅथमला चेंडू अजिबात समजला नाही आणि बाद झाल्यानंतर त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. यावेळी टॉम लॅथम आपले शतक पूर्ण करू शकला नाही.

भारताचा स्टार गोलंदाज अक्षर पटेल सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याच्या गोलंदाजीवर खेळणं न्यूझीलंडच्या खेळाडूंना सोपं नव्हतं. कानपूरच्या मैदानावर अक्षरला गोलंदाजीसाठी योग्य टर्न मिळाला.  

अक्षराच्या गोलंदाजीमुळे त्याने सामन्यात 5 बळी घेतले. त्याच्या घातक गोलंदाजीमुळे टीम इंडियाला सामन्यात दमदार पुनरागमन करता आलं.