धरमशाला कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, केएल राहुल OUT... दिग्गज खेळाडूचा समावेश

India Squad For 5th Test vs England : भारत आणि इंग्लंडदरम्यान येत्या सात मार्चपासून पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्याासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. 

राजीव कासले | Updated: Feb 29, 2024, 03:22 PM IST
धरमशाला कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, केएल राहुल OUT... दिग्गज खेळाडूचा समावेश title=

Team India Squad For Dharmashala Test vs England: भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिकेतील पाचवा कसोटी सामना येत्या 7 मार्चपासून धरमशालामध्ये खेळवण्यात येत आहे. या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. टीम इंडियाचा प्रमुक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचं संघात पुनरागमन झालं आहे. तर विकेटकिपर-फलंदाज केएल राहुल संघातून बाहेर गेला आहे. केएल राहुल दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे धरमशाला कसोटीत तो खेळणार की नाही याबाबत साशंकता होती. अखेर पाचव्या कसोटी सामन्यातून त्याला बाहेर करण्यात आलं आहे. बीसीसीआयचं वैद्यकीय पथक केएल राहुलवर उपचार करत आहे. 

बुमराहचं संघात पुनरागमन
पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियासाठी जमेची गोष्ट म्हणजे जसप्रीत बुमराहने संघात पुनरागमन केलं आहे. चौथ्या म्हणजे रांची कसोटीतून बुमराहला वगळण्यात आलं होतं. आता पाचव्या कसोटीसाठी तो उपलब्ध आहे. 

वॉशिंग्टन सुंदर रिलीज
फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरला संघातून रिलीज करण्यात आलं आहे. 2 मार्च 2024 पासून मुंबई विरुद्ध होणाऱ्या रणजी ट्रॉफी सेमीफायनलसाठी वॉशिंग्टन आपल्या तामिळनाडू संघातून खेळणार आहे. रणजी सामना पूर्ण झाल्यानंतर वॉशिंग्टन टीम इंडियाशी जोडला जाईल. 

मोहम्मद शमीबाबत अपडेट
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करणारा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबाबतही (Mohammad Shami) बीसीसीआयने (BCCI) अपडेट दिली आहे. 26 फेब्रुवारी 2024 रोजी शमीच्या उजव्या टाचेवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तो बरा होत असून पुनर्वसन प्रक्रियेसाठी तो बंगळुरू इथल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) जाणार आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. मोहम्मद शमीने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अवघ्या 7 सामन्यात 24 विकेट घेतल्या होत्या. पण विश्वचषक स्पर्धेनंतर दुखापतीमुळे भारतीय संघातून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.

टीम इंडियाकडे 3-1अशी आघाडी
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 3-1 अशी आघाडीवर आहे. पहिल्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला होता. पण त्यानंतर सलग तीन सामने जिंकत टीम इंडियाने मालिका खिशात घातली. आता चौथा सामना जिंकण्यासाठी रोहितसेना सज्ज झालीय.

पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघ
 रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.