वेस्ट इंडिजला २ वेळा 'चॅम्पियन' बनवणाऱ्याला पाकिस्तान नागरिकत्व देणार

वेस्ट इंडिजच्या या खेळाडूचा पाकिस्तानी नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज

Updated: Feb 23, 2020, 05:02 PM IST
वेस्ट इंडिजला २ वेळा 'चॅम्पियन' बनवणाऱ्याला पाकिस्तान नागरिकत्व देणार title=

मुंबई : वेस्ट इंडिजला २ वेळा वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या डॅरेन सॅमीला पाकिस्तानी नागरिकत्व देण्यात येणार आहे. डॅरेन सॅमी सध्या पीएसएलमध्ये पेशावर जाल्मीचं नेतृत्व करत आहे. डॅरेन सॅमीने पाकिस्तानचं नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. हा अर्ज पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. वेस्ट इंडिज सॅमीच्या नेतृत्वात २ टी-२० वर्ल्ड कप जिंकली आहे.

डॅरेन सॅमी हा सध्या पाकिस्तानमध्ये आहे. पीएसएलच्या पाचव्या मोसमात सॅमी खेळत आहे. पीएसएलची टीम पेशावर जाल्मीचे मालक जावेद आफ्रिदी यासाठी सॅमीची मदत करत आहेत. सॅमीला लवकरच पाकिस्तानचं नागरिकत्व आणि पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान दिला जाईल, असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.

डॅरेन सॅमीने आत्तापर्यंत पाकिस्तान सुपर लीगच्या सगळ्या मॅचमध्ये भाग घेतला आहे. सॅमीच्याआधी कोणताच परदेशी क्रिकेटपटू पाकिस्तानमध्ये मॅच खेळायला तयार नव्हता. सॅमीने अनेकवेळा पाकिस्तानबद्दलच त्याचं प्रेम जाहीर व्यक्त केलं आहे. २००९ साली श्रीलंकेच्या टीमवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये १० वर्ष कोणतीच आंतरराष्ट्रीय टीम क्रिकेट खेळायला तयार नव्हती.

डॅरेन सॅमीने वेस्ट इंडिजकडून ३८ टेस्ट मॅचमध्ये १,३२३ रन केले आणि ८४ विकेट घेतल्या. तर १२६ वनडेमध्ये त्याने १,८७१ रन केल्या आणि ८१ विकेट मिळवल्या. आंतरराष्ट्रीय टी-२० मॅचमध्ये सॅमीने ५८७ रन केल्या आणि ४४ विकेट घेतल्या. आयपीएलमध्ये सॅमी पंजाब, हैदराबाद या टीमकडून खेळला आहे. २०१० आणि २०१६ साली सॅमी कर्णधार असताना वेस्ट इंडिजने टी-२० वर्ल्ड कप जिंकला.