लंडन : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने कसोटी क्रिकेटमधून त्वरित निवृत्ती जाहीर केली आहे. 34 वर्षीय मोईन अलीने आता टेस्ट क्रिकेटला अलविदा म्हटलंय. टी -20 वर्ल्डकप, अॅशेस मालिका आणि कोरोना विषाणू यामुळे तो कुटुंबातील सदस्यांना वेळ देऊ शकत नव्हता.
आगामी टी-20 विश्वचषक आणि अॅशेस दोन्ही संघांचे संभाव्य सदस्य म्हणून येत्या काही महिन्यांत त्याला घरापासून लांब राहावे लागणार होते. त्यामुळे तो अस्वस्थ होता. तो सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे, परंतु मोईन अलीने अलीकडच्या काळात इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड आणि इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट यांना निवृत्तीची माहिती दिली असल्याचे समजते.
तो व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी आपली कारकीर्द सुरू ठेवण्यास उत्सुक आहे आणि काउंटी आणि फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहण्याची अपेक्षा आहे. तो प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणार नाही. परंतु अद्याप यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. मोईन अलीची उत्कृष्ट कसोटी कारकीर्द राहिली आहे. त्याला अष्टपैलू म्हणून ओळखले जाते, जिथे त्याने 100 हून अधिक विकेट आणि 2000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
2000 कसोटी धावा आणि 100 बळींचा टप्पा गाठणाऱ्या मोईन अली हा मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्याशिवाय इयान बाथम, गॅरी सोबर्स आणि इम्रान खान यांनी ही कामगिरी केली आहे. इंग्लंडच्या केवळ 15 गोलंदाजांनी त्याच्यापेक्षा जास्त कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. आयसीसी कसोटी क्रमवारीत तो तिसरा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने 2014 मध्ये कसोटीत पदार्पण केले आणि त्याच महिन्यात भारताविरुद्ध शेवटचा सामना खेळला. त्याने 64 सामन्यांमध्ये 5 शतके आणि 14 अर्धशतकांसह 2914 धावा केल्या आहेत आणि 195 विकेट देखील घेतल्या आहेत.