भारताचा माजी क्रिकेटपटू जेकब मार्टीनची मृत्यूशी झुंज

भारतीय क्रिकेट टीमचा माजी खेळाडू सध्या मृत्यूशी झुंज देतोय.

Updated: Jan 20, 2019, 10:51 PM IST
भारताचा माजी क्रिकेटपटू जेकब मार्टीनची मृत्यूशी झुंज title=

मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा माजी खेळाडू जेकब मार्टीन सध्या मृत्यूशी झुंज देतोय. जेकबचा २८ डिसेंबरला अपघात झाला. जेकब मार्टीनवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, पण त्याच्या कुटुंबियांना मदतीची गरज आहे. अपघातामध्ये जेकब मार्टीनच्या फुफ्फुस आणि यकृताला इजा झाली आहे. ४६ वर्षांचा जेकब मार्टीन सध्या व्हॅण्टिलेटरवर आहे. द टेलिग्राफनं दिलेल्या वृत्तानुसार मार्टीनच्या पत्नीनं बीसीसीआयकडे मदतीची मागणी केली होती. बीसीसीआयनंही लगेच मार्टीनच्या इलाजासाठी ५ लाख रुपये दिले आहेत.

बीसीसीआयचे माजी आणि बडोदा क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय पटेल यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. जेकबच्या उपचाराबद्दल मला कळलं तेव्हा मी त्याच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत केली. काही हितचिंतकांशी मी बोललो. बडोद्याचे महाराज समरजीतसिंग गायकवाड यांनी १ लाख रुपये देणगी दिली, तर ५ लाख रुपये गोळा केले, असं संजय पटेल म्हणाले.

एकावेळी रुग्णालयाचं बिल ११ लाख रुपयांच्या वर गेलं होतं. यामुळे रुग्णालयानंही औषधं देणं बंद केलं होतं. पण बीसीसीआयनं रुग्णालयाला थेट पैसे दिले आणि तेव्हापासून उपचार सुरु आहेत, अशी प्रतिक्रिया संजय पटेल यांनी दिली.

जेकब मार्टीन याच्या उपचारासाठी दिवसाला ७० हजार रुपयांचा खर्च आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशननं २.७० लाख रुपये (३० हजार रुपयांचा टीडीएस कापून) जेकबच्या उपचारासाठी दिले आहेत. पण बडोदा क्रिकेट असोसिएशन यापेक्षा जास्त मदत करेल, अशी अपेक्षा आहे. जेकब मार्टीनच्या नेतृत्वात बडोद्यानं रणजी ट्रॉफी जिंकली होती. जेकब मार्टीन यानं भारतासाठी १० वनडे मॅच खेळल्या होत्या.