दोनदा टी 20 वर्ल्ड कप जिंकून देणारा ऑलराऊंडर खेळाडू भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकला, ICC कडून नोटीस

भ्रष्टाचाराच्या प्रकरणी या माजी क्रिकेटपटूला आता 14 दिवसांमध्ये स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.  

Updated: Sep 22, 2021, 08:22 PM IST
दोनदा टी 20 वर्ल्ड कप जिंकून देणारा ऑलराऊंडर खेळाडू भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकला, ICC कडून नोटीस  title=

मुंबई : वेस्टइंडिजचा West Indies माजी क्रिकेटपटू मार्लन सॅम्यूएल्सने (Marlon Samuels) आपल्या बॅटिंगच्या जोरावर विंडिजला दोनदा वर्ल्ड कप (T 20 World Cup) जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. हाच सॅम्यूएल्स आता भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकला आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी विभागाने सॅम्यूएल्सला 4 गुन्ह्यांच्या आरोपांखाली नोटीस बजावली आहे. रिपोर्टनुसार, सॅम्यूएल्सने टी 10 क्रिकेट स्पर्धेत (T10 league) भ्रष्टाचार विरोधी नियमांचा भंग केला होता. (Former West Indies all rounder Player Marlon Samuels charged icc Anti Corruption Code)   

आयसीसीने दिलेल्या नोटीसीनुसार सॅम्यूएल्सला 14 दिवसांमध्ये उत्तर द्यावं लागणार आहे. विंडिजने 2012 आणि 2016 मध्ये टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याचा कारनामा केला होता. या दोन्ही अंतिम सामन्यात  सॅम्यूएल्सने सर्वाधिक धावा केल्या होत्या. 

आयसीसीने या संदर्भात निवेदन प्रसिद्ध केलंय. त्यानुसार सॅम्यूएल्सने आयसीसीच्या अनुच्छेद 2.4.2  या नियमाचं उल्लंघन केलंय.  सॅम्युल्सला  टी 10 क्रिकेट स्पर्धेदरम्यान काही बक्षिसं देण्यात आली होती. या बक्षिसांबद्दल  सॅम्यूएल्सला आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याला चौकशीदरम्यान समाधानकारक माहिती देता आली नाही.

तसेच चौकशीदरम्यान सॅम्यूएल्सने अधिकाऱ्यांना सहकार्य न केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला.  

विंडीजला दोनदा टी -20 वर्ल्ड कप जिंकून देण्यात योगदान

मार्लन सॅम्यूएल्सने विंडीजला दोनदा टी 20 वर्ल्ड कप जिंकून देण्याचा महत्त्वाची भूमिका बजावली होती. सॅम्यूएल्सने वर्ल्ड कपच्या या दोन्ही अंतिम सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी केली होती. सॅम्यूएल्सने 2012 च्या टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंके विरुद्ध 56 चेंडूंमध्ये 78 धावांची खेळी केली होती. यामुळे विंडीजचा 36 धावांनी विजय झाला होता.

तर यानंतर 2016 च्या टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध 66 बॉलमध्ये  85 धावा केल्या होत्या. सॅम्यूएल्सच्या या खेळीमुळे विंडीज दुसऱ्यांदा विश्व विजेता ठरला होता.  

सॅम्यूएल्सने गेल्या वर्षी क्रिकेटला रामराम ठोकला. सॅम्यूएल्सने 71 कसोटी सामन्यांमध्ये 1 द्विशतक आणि 7 शतकांच्या मदतीने 3 हजार 917 धावा केल्या. तर 207 वनडेमध्ये 32.98 च्या सरासरीने 10 शतकांसह 5 हजार 606  धावा केल्या. तसेच 67 टी 20 सामन्यांमध्ये 1 हजार 611 धावा केल्या होत्या.