IND vs AFG : नेमकी चूक कोणाची? रोहित शर्मा की शुभमन गिल? गावस्कर स्पष्टच म्हणाले...

IND vs AFG T20I : अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात रोहित शर्माच्या रनआऊटवरून मोठा वाद उभा राहिला होता. त्यात नेमकी चूक कोणाची होती? रोहित की शुभमन यावर माजी क्रिकेटरने मोठं वक्तव्य केलंय.

सौरभ तळेकर | Updated: Jan 13, 2024, 04:45 PM IST
IND vs AFG : नेमकी चूक कोणाची? रोहित शर्मा की शुभमन गिल? गावस्कर स्पष्टच म्हणाले... title=
Rohit Sharma Run Out controversy

Rohon Gavaskar On Run Out controversy : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वीच्या अखेरच्या टी-ट्वेंटी सिरीजमधील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने या सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी देखील घेतली. मात्र, या सामन्यात सर्वात चर्चेचा विषय ठरला तो रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल यांच्या रन घेताना झालेला गोंधळ... या गोंधळामुळे रोहित शर्माला त्याची विकेट गमवावी लागली. या रनआऊटनंतर रोहित शर्मा (Rohit Sharma Run Out controversy) चांगलाच भडकल्याचं दिसून आलं. त्यावेळी त्याने शुभमन गिलला भोसडलं. त्यानंतर रनआऊटवरून मोठा वाद उभा राहिला होता. त्यात नेमकी चूक कोणाची होती? यावर माजी क्रिकेटर रोहन गावस्कर (Rohon Gavaskar) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

गावस्कर यांनी केलेल्या विश्लेषणामुळे नेमकी चूक समोर आली आहे. रोहित शर्माने दुसरा चेंडू मिड ऑफच्या दिशेने टोलवला होता. त्यावेळी रोहितने कॉल देत नॉन स्ट्राईक इन्डला धाव घेतली होती. त्यावेळी शुभमन गिलने धाव घेतलीच नाही, त्यामुळे टीम इंडियाला पहिलाच मोठा धक्का बसला होता. अशातच आता रोहन गावस्कर यांनी शुभमन गिल कसा चुकला? यावर विश्लेषण केलंय.

काय म्हणाले गावस्कर?

आरामात रन निघू शकला असता. खरं सांगायचं झालं तर शुभमन चालत गेला असता तरी धाव निघाली असती. बॅटिंग करताना रोहित शर्मा कूल खेळाडू असतो. मात्र, त्याला क्वचित राग येताना दिसतो. धाव घेण्याचा कॉल स्ट्राईकचा असतो. त्यामुळे रोहित शर्माच डेंजर झोनच्या दिशेने पळत होता. आऊट झाला असता तर तोच झाला असता. शुभमन गिलने रोहित शर्मावर विश्वास ठेवायला हवा होता. चूक पहायला गेली तर शुभमन गिलची चूक आहे. शुभमन फक्त चेंडूकडे पहात राहिला, असं रोहन गावस्कर म्हणाले आहेत.

रोहित शर्मा काय म्हणाला?

खरं सांगायचं तर अशा गोष्टी म्हणजे रन आऊट वेगैरे होत राहतात. ज्यावेळी अशी घटना घडते तेव्हा तुम्ही निराश होता. कारण तुमची तिथे उभं राहून खेळण्याची इच्छा असते आणि टीमसाठी रन करायचे असतात. मला असं वाटतं गिलने एक चांगली खेळी खेळावी, मात्र तो आऊट झाला. प्रत्येक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडत नाही, असं रोहित शर्मा रनआईट विवादावर म्हणाला आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला टी-20 सामना जिंकत टीम इंडियाने सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. आता दुसरा सामना रविवारी खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी रोहित शर्मा उपलब्ध असलेल्या विराट कोहलीला संघात सामील करून घेऊ शकतो.