VIDEO : भारतीय चाहत्यांकडून पंतची सुरेल प्रशंसा

गाण्याच्या माध्यमाचून काढला ऑस्ट्रेलियाचा वचपा   

Updated: Jan 5, 2019, 11:52 AM IST
VIDEO : भारतीय चाहत्यांकडून पंतची सुरेल प्रशंसा

 भारतीय क्रिकेट संघातून खेळणाऱ्या क्रिकेटर ऋषभ पंतने सध्या क्रीडारसिकांची मनं जिंकत आपलं असं वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या निमित्ताने सिडनी येथे खेळल्या जाणाऱ्या चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पंतच्या कामगिरीने सर्वांचच लक्ष वेधलं. त्याच्या १५९ धावांच्या खेळीने भारतीय संधाच्या धावसंख्येला खऱ्या अर्थाने आणखी मजबूत स्थितीत नेऊन ठेवलं. 

पंतची ही कामगिरी फक्त ज्येष्ठ क्रिकेटरचीच मनं जिंकून गेली असं नाही, तर मैदानात सामना पाहण्यासाठी आलेल्या भारत आर्मीच्या मंडळींच्या मनावरही अधिराज्य गाजवून गेली. बरं ते ही असं की ही मंडळी पंतच्या नावाचा अक्षरश: करु लागली. 
'We’ve got Pant....Rishab Pant, I just don’t think you’ll understand.... He’ll hit you for a six, He’ll babysit your kids....We’ve got Rishab Pant', हे असं गाणं म्हणत भारत आर्मीच्या मंडळींनी पंतची वाहवा केलीच सोबतच त्यांनी ऑस्ट्रेलियावर निशाणाही साधला. 

काय होता वाद? 

ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टीम पेन याने तिसऱ्या कसोटीमध्ये स्लेजिंग करत पंतला तू माझी मुलं सांभाळ मी पत्नीला बाहेर फिरायला घेऊन जातो असा टोमणा लगावला होता. पेनच्या या टोमण्यानंतर पंतनेही ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजी करत असताना त्याला ‘तात्पुरता कर्णधार’ म्हणत त्याचा वचपा काढला होता. 

बरं हे इथवरच थांबलं नाही. या सर्व प्रकारानंतर ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या घरी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी टीम पेनच्या पत्नीने ऋषभबरोबर काढलेला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तो खूप चांगला 'बेबीसीटर' असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळेच मैदानात आणि मैदानाबाहेर केवळ भारतीयच नाही तर ऑस्ट्रेलियन चाहतेही पंतच्या प्रेमात पडले आहेत. 

तिची पोस्ट, पंतची कसोटी सामन्यातील कामगिरी आणि हे एकंदर वातावरण पाहता याच पार्शवभूमीवर पंत सारं काही करुच शकतो, या आशयाचं एक सूचक गाणं भारत आर्मीकडून तयार करण्यात आलं आणि तितक्याच उत्साहात ते मैदानात म्हटलंही गेलं.