Wimbledon 2021: भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्झा यांनी विम्बल्डन 2021 च्या मिश्र दुहेरीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मागील 53 वर्षांमध्ये कधीही न घडलेला हा क्षण क्रीडा वर्तुळाचं लक्ष वेधून गेला.
सानिया आणि बोपन्नानं भारताच्याच रामकुमार रामनाथन आणि अंकिता रैना या जोडीचा 6-2, 7-6 (5)असा सरळ सेटमध्य़े पराभव केला आहे. विम्बल्डनमध्ये पहिल्यांदाच दोन भारतीय जोड्या आमनेसामने खेळल्या आणि त्यांनी साऱ्या क्रीडा वर्तुळाचं लक्ष वेधलं किंबहुना त्यांच्या नावे या विक्रमी कामगिरीचीच नोंद झाली. सानिया-बोपन्नानं पहिला सेट अगदी आरामात जिंकला. पण या दोघांना नवख्या जोडीने दुसऱ्या सेटमध्ये विजयासाठी चांगलंच झुंजवलं. दरम्यान सानियानं महिला दुहेरीच्या दुसऱ्या राऊंडमध्येही प्रवेश केला आहे. त्यामुळं तिच्या कामगिरीवर सर्वांच्याच नजरा असतील.
रामनाथननं या सामन्याच्या माध्यमातून ग्रँडस्लॅमच्या जगतता पदार्पण केलं. दरम्यान या मिश्र दुहेरीच्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यात बाजी मारणारी बोपन्ना आणि सानियाची जोडी दुसऱ्या फेरीत आव्हानांचा सामना करताना दिसली. दमदार सर्विस आणि बेसलाईनच्या बळावर बोपन्नानं ग्राऊंड स्ट्रोक्सनं आपल्या खेळातील कौशल्य सर्वांना दाखवून दिलं. त्याला इथं साथ मिळाली ती म्हणजे सानियाच्या खेळाची.
यंदाच्या वर्षी 4 वर्षांनी सानिया विम्बल्डनमध्ये परतली आहे. 2018 मध्ये प्रसुतीनंतर सानियाने थेट मागच्या वर्षी हॉबार्ट इंटरनॅशनल डब्ल्यूटीए हा किताब जिंकत तिनं टेनिस कोर्टवर दमदार पुनरागमन केलं होतं. आतापर्यंत सानियानं तिच्या टेनिस कारकिर्दीत 6 ग्रँड स्लॅम जेतेपतं आपल्या नावे केली आहेत. 2015 मध्ये सानियानं स्वित्झर्लंडची खेळाडू मार्टिना हिंगिस हिच्या साथीनं विम्बल्डनचा किताब आपल्या नावे केला होता.