IPL 2022, Punjab Kings : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) खेळाडूंना रिटेन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पंजाब किंग्सचा (Punjab Kings) प्रमुख खेळाडू केएल राहलुने (KL Rahul) करारमुक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता आणखी एका दिग्गजाने पंजाब किंग्सची साथ सोडली आहे.
पंजाब किंग्सचे सहाय्यक प्रशिक्षक अँडी फ्लॉवर (Andy Flower) यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आयपीएल 2022 पूर्वीच पंजाब किंग्जची सुरुवात चांगली झालेली नाही, अशा परिस्थितीत पंजाब किंग्जला नवीन हंगामापूर्वी चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.
प्रशिक्षकपदाचा राजीनामा
झिम्बाब्वेचे माजी खेळाडू अँडी फ्लॉवरने पंजाब किंग्जच्या सहाय्यक प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. आयपीएल 2022 च्या हंगामात अँडी फ्लॉवर नवीन संघात सामील होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे प्रमुख खेळाडू आणि माजी कर्णधार असलेल्या अँडी फ्लॉवर यांनी याआधी इंग्लंड क्रिकेट संघाचं प्रशिक्षकपद भूषवलं आहे. 2020 मध्ये, त्यांनी आयपीएलमध्ये प्रवेश केला आणि पंजाब किंग्जशी ते जोडले गेले. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अँडी फ्लॉवर यांनी आपला राजीनामा संघाकडे सोपवला असून तो स्वीकारण्यात आला आहे.
अँडी फ्लॉवर नविन संघासोबत?
अँडी फ्लॉवर लखनऊ किंवा अहमदाबाद संघात सामील होऊ शकतात, असं बोललं जातं आहे. पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुल देखील संघापासून वेगळा झाला आहे, आणि तो लखनऊ संघात सामील होऊ शकतो, अशी शक्यता आहे.
पंजाबने दोन खेळाडूंना केलं रिटेन
पंजाब किंग्सने मयांक अग्रवाल आणि अर्शदीप सिंगला संघात कायम ठेवलं आहे. मयांकला 12 कोटी तर अर्शदीपला 4 कोटी देण्यात आले आहेत. पंजाब किंग्सला के एल राहुलला संघात कायम ठेवायचं होतं, पण त्याने करारमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. पंजाब किंग्सजे सह मालक नेस वाडिया यांनी मात्र केएला राहुलला एका संघाने संपर्क साधल्याचा आरोप केला असून हे नियमांच्या विरुद्ध असल्याचं म्हटलं आहे.