मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) क्रिकेटशिवाय इतर कोणता खेळ आवडतो तर तो म्हणजे फुटबॉल (football). क्रिकेट सामन्यापूर्वी सराव सत्रात धोनी फुटबॉल खेळताना दिसतो. याशिवाय तो बॉलिवूड चॅरिटी आणि मैत्रीपूर्ण सामन्यांमध्ये फूटबॉल खेळताना दिसला आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज (SRH vs CSK) यांच्यातील सामन्यापूर्वी धोनी फुटबॉल खेळताना दिसला होता. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना हे पाहून आश्चर्य वाटले नाही. धोनीच्या फुटबॉलवरील प्रेमाविषयी त्यांनी एक गोष्ट सांगितली.
शास्त्री यांनी आशिया चषकातील (Asia Cup) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या आठवणी सांगितल्या. नाणेफेकच्या पाच मिनिटे आधी धोनी मैदानात दव पडलेला असताना फुटबॉल खेळत होता. शास्त्रींनी त्यांना थांबण्यास सांगितले. शास्त्री यांनी आयपीएलच्या अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सशी केलेल्या संभाषणात कबूल केले की, ते त्यांच्या आयुष्यात कधीही कोणावरही इतक्या मोठ्याने ओरडले नसतील. धोनीला दुखापतीपासून वाचवण्यासाठी त्यांनी असे केले होते.
रवी शास्त्री म्हणाले की, 'धोनीला फुटबॉल खेळायला आवडते. तो ज्या तीव्रतेने फुटबॉल खेळतो ते पाहून तुम्ही ही घाबरून जाल. त्याला दुखापत होणार नाही अशी आशा करायला हवी. मला आठवते की, आशिया कपच्या अंतिम सामन्यात नाणेफेक झाली होती आणि नाणेफेकीच्या पाच मिनिटे आधी दव पडले होते. मी माझ्या आयुष्यात कधीही कोणावर इतका ओरडलो नव्हतो. मी त्यांना म्हणालो - खेळ थांबवा. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तुम्हाला तुमचा मुख्य खेळाडू गमावायचा नाही, पण त्याला फुटबॉलपासून दूर नेणे अशक्य आहे.'
सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचे झाले तर त्या सामन्यात धोनीचा संघ हरला होता. चेन्नईचा सलग चौथ्या सामन्यात पराभव झाला. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने 20 षटकांत 7 बाद 154 धावा केल्या. मोईन अलीने 48 धावा केल्या. धोनीला सहा चेंडूत केवळ तीन धावा करता आल्या. प्रत्युत्तरात हैदराबाद संघाने 17.4 षटकात 2 बाद 155 धावा करत सामना जिंकला.