IPL Eliminator 2021 | अटीतटीच्या सामन्यात कोलकाताचा बंगळुरुवर 4 विकेट्सने विजय

बंगळुरुने (RCB) कोलकाताला (KKR) विजयासाठी 139 धावांचे आव्हान दिले होते. 

Updated: Oct 11, 2021, 11:37 PM IST
IPL Eliminator 2021 | अटीतटीच्या सामन्यात कोलकाताचा बंगळुरुवर 4 विकेट्सने विजय title=

यूएई : शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या रंगतदार सामन्यात कोलकाताने बंगळुरुवर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. बंगळुरुने कोलकाताला विजयासाठी 139 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान कोलकाताने 6 विकेट्स  गमावून 2 चेंडूंआधी पूर्ण केलं. (ipl eliminator 2021 rcb vs kkr Kolkata Knight Riders beat royals chalengers banglore by 4 wickets at  Sharjah Cricket Stadium)

कोलकाताकडून शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यर या सलामी जोडीने आश्वासक सुरुवात मिळवून दिली. दोघांनी 41 धावांची भागीदारी केली. शुबमनने 29 तर व्यंकटेशने  26 धावांची खेळी केली. राहुल त्रिपाठीने निराशा केली. तो 6 धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर मीडल ऑर्डरमध्ये नितीश राणाने 23 धावा केल्या. 

सुनील नारायणची अष्टपैलू कामगिरी 

सुनील नारायणने बॉलिंगसह बॅटिंगनेही कमाल केली. सुनीलने 15 चेंडूत निर्णायक क्षणी 26 धावा केल्या. सोबतच बोलिंग करताना त्याने 4 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

सुनील मागोमाग दिनेश कार्तिकही 10 धावा करुन आऊट झाला. सलामी जोडी आणि मीडल ऑर्डरच्या फलंदाजांनी केलेल्या खेळीने कोलकाताच्या विजयाचा पाया रचला. मात्र कोलकाताने ठराविक अंतराने विकेट्स टाकल्याने सामना अखेरच्या ओव्हरपर्यंत गेला. 

मात्र या फलंदाजांची मेहनत कर्णधार इयोन मॉर्गन आणि शाकिब अल हसनने वाया जावू दिली नाही. या दोघांनी मैदानात टिकत टीमला विजयापर्यंत पोहचवलं. शाकिबने नाबाद 9  तर मॉर्गनने नॉट आऊट 5 धावा केल्या. 

बंगळुरुकडून मोहम्मद सिराज, हर्षल पटेल आणि युजवेंद्र चहल या तिकडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. बंगळुरुच्या गोलंदाजांनी 139 धावांचा चांगला बचाव करत सामना शेवटपर्यंत ताणून धरला. मात्र अखेरच्या ओव्हरमध्ये कोलकाताने मात केली.

त्याआधी टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या बंगळुरुने कोलकाताला विजयासाठी 139 धावांचे आव्हान दिले होते. 

बंगळुरुने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 138 धावा केल्या. आरसीबीकडून कर्णधार विराट कोहलीने 33 चेंडूत 5 चौकारांसह 39 धावांची खेळी केली. तर सलामीवीर देवदत्त पडीक्कलने 21 धावा केल्या. 

कोलकाताकडून फिरकीपटू सुनील नारायणने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर लॉकी फर्ग्यूसनने 2 फलंदाजांना माघारी पाठवलं.

कोलकाताची आता दिल्लीशी गाठ

दरम्यान बंगळुरुवर मात करत कोलकाताने क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली आहे. आता या सामन्यात अंतिम फेरीसाठी कोलकाता विरुद्ध दिल्ली यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.

हा सामना 13 ऑक्टोबरला शारजाहमध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. 

RCB Playing Eleven : विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, श्रीकर भारत (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, एबी डीव्हीलियर्स, शाहबाज अहमद, डैन क्रिश्चियन, जॉर्ज गार्टन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल. 

कोलकाताचे शिलेदार : शुभमन गिल, वेंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इयोन मोर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाकिब अल हसन, सुनील नरेन, लॉकी फर्ग्यूसन, शिवम मावी आणि वरुण चक्रवर्ती.