मुंबई : भारताचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू इरफान पठाणला मोठा धक्का बसला आहे. रणजी क्रिकेटमध्ये बडोद्याकडून खेळणाऱ्या इरफानला पहिले कर्णधारपदावरून आणि त्यानंतर १५ सदस्यीय टीममधून डच्चू देण्यात आला.
टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयावर इरफान पठाण चांगलाच भडकला आहे. ट्विटरवरून इरफाननं नाराजी व्यक्त केली आहे. गुड मॉर्निंग म्हणणार नाही. बॉसची हाजी-हाजी न करणं तुमच्या कारकिर्दीच्या विरोधात जाऊ शकतं. पण काळजी करू नका, तुम्ही तुमचं काम करत राहा, असं ट्विट इरफाननं केलं आहे.
Not wishing Good Morning & not being a YES man to ur boss can go against u...but don’t bother,keep doing ur work #keepfighting #keeptrying
— Irfan Pathan (@IrfanPathan) October 29, 2017
रणजी ट्रॉफीमध्ये बडोद्याच्या टीमची कामगिरी निराशाजनक झाली. ग्रुप सीमध्ये बडोद्याची टीम शेवटच्या क्रमांकावर राहिली. मध्य प्रदेशविरुद्धच्या मॅचमध्ये बडोद्याला पराभव पत्करावा लागला. पहिल्या मॅचमध्ये इरफाननं ८० रन्सची खेळी केली होती, तसंच विकेटही घेतल्या होत्या.
२००३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध इरफान पठाणनं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पाकिस्तान दौऱ्यावर असताना इरफान पठाणनं हॅट्रिक घेतल्यामुळे इरफान नावारुपाला आला होता. २००८मध्ये इरफाननं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटची टेस्ट मॅच खेळली. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये इरफाननं भारतीय टीममध्ये पुनरागमन करण्याची आशा सोडून दिल्याचं सांगितलं होतं. भारतीय टीमनंही माझ्या पुनरागमनाची वाट बघणं सोडून दिलं आहे, असं इरफान म्हणाला होता.