न्यूझीलंडनं ४९ वर्षात पहिल्यांदाच पाकिस्तानला 'घरच्या मैदानात' हरवलं

न्यूझीलंडनं पाकिस्तानविरुद्धची तिसरी टेस्ट मॅच १२३ रननी जिंकली आहे.

Updated: Dec 7, 2018, 07:52 PM IST
न्यूझीलंडनं ४९ वर्षात पहिल्यांदाच पाकिस्तानला 'घरच्या मैदानात' हरवलं title=

अबुधाबी : न्यूझीलंडनं पाकिस्तानविरुद्धची तिसरी टेस्ट मॅच १२३ रननी जिंकली आहे. याचबरोबर ३ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये न्यूझीलंडचा २-१नं विजय झाला आहे. सीरिजची पहिली टेस्ट न्यूझीलंडनं तर दुसरी टेस्ट पाकिस्ताननं जिंकली होती. न्यूझीलंडनं ४९ वर्षांमध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानला त्यांच्या घरामध्ये हरवलं आहे. श्रीलंकेच्या टीमवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान त्यांच्या घरातल्या सीरिज युएईमध्ये खेळतं.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. विलियमसननं पहिल्या इनिंगमध्ये ८९ रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये १३९ रनची खेळी केली. पाकिस्तानचा लेग स्पिनर यासिर शाहला मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं. यासिरनं ३ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये सर्वाधिक २९ विकेट घेतले. यासिर शाहनं तिसऱ्या मॅचमध्येच सर्वात जलद २०० विकेट घेण्याचा विश्वविक्रमही केला होता. ३३व्या टेस्टमध्ये यासिर शाहनं टेस्ट कारकिर्दीतला २०० विकेटचा टप्पा गाठला.

या दोन्ही टीममध्ये खेळवण्यात आलेली तिसरी टेस्ट मॅच रोमांचक झाली. या मॅचमध्ये न्यूझीलंडनं पहिल्या इनिंगमध्ये २७४ रन केले. याला उत्तर म्हणून पाकिस्ताननं पहिल्या इनिंगमध्ये ३४८ रन बनवले. त्यामुळे पाकिस्तानला ७४ रनची आघाडी मिळाली. दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंगला आलेल्या न्यूझीलंडच्या ४ विकेट ६० रनवरच गेल्या होत्या. पण केन विलियमसननं १३९ रन आणि हेनरी निकोल्सनं नाबाद १२६ रनची खेळी करून न्यूझीलंडचा डाव सावरला.

न्यूझीलंडनं मॅचच्या पाचव्या दिवशी ३५३/७ वर डाव घोषीत केला. यानंतर पाकिस्तानला ७९ ओव्हरमध्ये २८० रनचं लक्ष्य मिळालं. पाचव्या दिवसाची खेळपट्टी पाहता हे आव्हान खडतर होतं. लंच होईपर्यंत पाकिस्ताननं ५५ रनवर ५ विकेट गमावल्या होत्या. लंचनंतरही न्यूझीलंडनं पाकिस्तानला धक्के दिले. ५६.१ ओव्हरमध्ये पाकिस्तानची टीम १५६ रनवर ऑल आऊट झाली आणि न्यूझीलंडनं हा सामना खिशात टाकला.