Perks And Benefits To India New Head Coach Gautam Gambhir: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने अधिकृतपणे गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख प्रशिक्षक म्हणून 9 जुलै रोजी घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत असलेला राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा करार संपुष्टात आल्यानंतरपासून गंभीरच भारतीय प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर होता. अता गंभीरच्या नावाची घोषणा झाली असून श्रीलंकेच्या दौऱ्यापासून गंभीर प्रशिक्षकपदाची सूत्रं हाती घेणार आहे.
गंभीरच्या नावाची औपचारिक घोषणा होण्याआधी त्याच्या मानधनावरुन बीसीसीआयकडून घासाघीस सुरु असल्याच्या बातम्या समोर आल्या. पगारासंदर्भातील आकड्यामुळेच गंभीरच्या नियुक्तीची घोषणा करण्यास उशीर झाल्याचंही सांगितलं जात आहे. द्रविडला 12 कोटी रुपये वर्षिक पगार दिला जात होता. मात्र गंभीरला त्याहूनही अधिक पगार दिला जाईल असं सांगितलं जात आहे. गंभीरला 14 ते 15 कोटींपर्यंत पगार मिळू शकतो असा एक अंदाज बांधला जात असला तरी या आकड्याला कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
मात्र भारतीय संघाला प्रशिक्षक झाल्यानंतर केवळ पगार आणि मान या दोनच गोष्टी संबंधित व्यक्तीला मिळतात असं नाही. तर 2019 साली भारतीय क्रिकेट बोर्डाने केलेल्या नियमांनुसार, ज्या वेळेस भारतीय संघ परदेश दौऱ्यावर असतो तेव्हा प्रशिक्षकला दररोज 250 अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 21 हजार रुपये दिले जातात. विशेष म्हणजे हे 21 हजार रुपये बिझनेस क्लासचा विमान प्रवास, राहण्याची सोय आणि लॉण्ड्रीचा खर्च वगळता दिले जातात, असं आयएएनएस या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
नक्की वाचा >> खरा जेंटलमॅन! द्रविडने नाकारले शाहांनी दिलेले 2.5 कोटी; कारण वाचून म्हणाल, 'कमाल आहे हा माणूस'
गौतम गंभीरलाही जागतिक दर्जाच्या प्रवास सुविधांबरोबरच उत्तम हॉटेल्समध्ये राहण्याची संधी भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून मिळणार आहे. संपूर्ण संघाने आणि सहाय्यक प्रशिक्षकांनी उत्तम मनस्थितीमध्ये राहून काम करावं या हेतूने त्यांनाही उत्तम सोयीसुविधा दिल्या जातात.
गंभीरने यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या मेंटॉर पदाची जबाबदारी पार पाडली आहे. 2024 चं आयपीएल गंभीरच्या नेतृत्वाखाली श्रेयस अय्यरच्या संघाने जिंकलं. गौतम गंभीरने सुचवलेले काही बदल खरोखरच कोलकात्याला तिसऱ्यांदा आयपीएल चषकापर्यंत घेऊन जाण्यासाठी कारणीभूत ठरल्या. यापूर्वी गंभीरने लखनऊ सुपरजायट्सच्या संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी पार पाडली होती.
नक्की वाचा >> 'त्याला भारतात कोणीही विचारत नाही, त्याने आधी...'; शास्त्रींनी माजी कर्णधाराची लाजच काढली
गंभीर त्याच्या आक्रमक शैलीसाठी ओळकला जातो. त्यामुळे आता भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून तो कसा काम करतो हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. खास करुन टी-20 च्या संघामधील नव्या खेळाडूंबरोबर तो कसं जुळून घेतो हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.