राहुल द्रविडची फसवणूक, या कंपनीनं गंडवलं

देशातल्या अनेक कंपन्यांनी नागरिकांची फसवणूक केल्याच्या बातम्या नेहमीच प्रसिद्ध होतात.

Updated: Mar 12, 2018, 04:35 PM IST
राहुल द्रविडची फसवणूक, या कंपनीनं गंडवलं

बंगळुरू : देशातल्या अनेक कंपन्यांनी नागरिकांची फसवणूक केल्याच्या बातम्या नेहमीच प्रसिद्ध होतात. याचाच फटका काही खेळाडूंनाही बसला आहे. भारताचा माजी कॅप्टन राहुल द्रविड, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि प्रकाश पदुकोण यासारखे खेळाडू आणि जवळपास ८०० जणांना विक्रम इनव्हेस्टमेंट या कंपनीनं कोट्यवधींचा चुना लावला आहे. या ८०० जणांपैकी अनेकजण चित्रपट, खेळ आणि राजकारणाशी जोडले गेले आहेत.

कर्नाटकच्या बंगळुरूची असलेली विक्रम इनव्हेस्टमेंट नावाच्या कंपनीनं राहुल द्रविड, सायना नेहवाल आणि प्रकाश पदुकोण यांच्यासारख्या सेलिब्रिटींची फसवणूक केली. पोलिसांनी कंपनीचा मालक राघवेंद्र श्रीनाथ आणि एजंट म्हणून काम करणारा सुतराम सुरेश, नरसिम्हामूर्ती, केसी. नागराज आणि प्रल्हाद यांना अटक केली आहे.

क्रीडा पत्रकाराची मदत

सुतराम सुरेश बंगळुरूमधला क्रीडा पत्रकार आहे. या स्कीममध्ये पैसे गुंतवण्यासाठी सुरेश खेळाडूंना तयार करायचा. या आरोपींना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. या सगळ्यांनी ३०० कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज आहे. आरोपींच्या बँक खात्यांची चौकशी सध्या सुरु आहे.

फसवणूक करणारी ही कंपनी गुंतवणूकदारांना ४० टक्के परतावा देण्याचं आश्वासन देत होती. फसवणूक झाली असली तरी या खेळाडूंनी मात्र अजूनही याबाबत अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.