Rajashree Swain last call : शुक्रवारी क्रिकेटविश्वातून एक मोठी बातमी समोर आली. 11 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या 22 वर्षीय महिला क्रिकेटरचा मृतदेह जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. राजश्री स्वेन (Rajashree Swain) असं मृत महिला क्रिकेटरचं नाव होतं. गुरुवारी तिच्या कोचने कटक शहरातील मंगलाबाग पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता असल्याचा रिपोर्ट केला होता.
दरम्यान या घटनेबाबत राजश्री स्वेनच्या भावाचं विधान समोर आलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, राजश्रीने फोनवर सांगितलं होतं की, काही खेळाडूंचं पैसे देऊन टीममध्ये सिलेक्शन होतंय. यामुळे तिला रिजेक्ट करण्यात आलं होतं. यानंतर आम्ही राजश्रीला पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा फोन स्विच ऑफ आला.
तिचा भाऊ पुढे म्हणाला की, ती एक स्ट्रॉग महिला होती आणि ती कधीच आत्महत्या करू शकत नाही. 1 जानेवारी 2021 मध्ये तिने मला फोनवर सांगितसं होतं की, सतत होत असलेल्या रिजेक्शनच्या बाबतीत OCA टीम आणि कोचशी बोलणार आहे.
महिला क्रिकेटरच्या कुटुंबीयांनी आरोप केलाय की, राजश्रीच्या शरीरावर जखमेच्या खुणा होत्या. शिवाय तिच्या डोळ्याला देखील जखम झाली होती. त्यामुळे ही हत्या आहे. मात्र अद्याप तिच्या मृत्यूचं कारण समजू शकलेलं नाही.
राजश्रीच्या मृत्यूचं अद्याप कोणतीही कारण समोर आलं नाही. तिच्या प्रशिक्षकांनी गुरूवारी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. आज तिचा मृतदेह जंगलामध्ये आढळला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करत शवविच्छेदनासाठी पाठवला होता.
ओडिशा क्रिकेट असोसिएशनने बज्रकाबती भागात प्रशिक्षण शिबिरात आयोजित केलं होतं. पुद्दुचेरी येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये 25 महिला क्रिकेटपटू सहभागी झाल्या होत्या. या सर्व एका हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. ओडिशा राज्य महिला क्रिकेट संघाची 10 जानेवारी रोजी घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये राजश्रीचा समावेश नव्हता.
दरम्यान, राजश्री चांगली खेळत होती तरीसुद्धा वारंवार दुर्लक्ष करून मानिसक छळ करण्यात आल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी राजश्रीच्या मृत्यूची अनैसर्गिक नोंद केली आहे. प्रशिक्षक आणि ओसीए व्यवस्थापनाची चौकशी होणार आहे.