मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचे ट्विटची नेहमीच चर्चा होते. कोणाला वाढदिवसाची शुभेच्छा असो किंवा कोणाची मस्करी करणं असो, सेहवागचे ट्विट हे नेहमीच हटके असतात. अशा ट्विटमुळे सेहवाग अनेकदा ट्रोलही होतो. रविवारीही चुकीचं ट्विट केल्यामुळे सेहवाग ट्रोल झाला आहे.
रविवारचा दिवस भारतीय क्रीडा जगतासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. भारत आणि पाकिस्तानमधली चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल, भारत-पाकिस्तानचा हॉकी सामना आणि इंडोनेशिया ओपनची किदांबी श्रीकांतची मॅच रविवारी झाली.
किदांबी श्रीकांत इंडोनेशिया ओपन जिंकल्यानंतर सेहवागनं त्याला शुभेच्छा दिल्या. इंडोनेशिया ओपन जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू झाल्याबद्दल श्रीकांतला शुभेच्छा असं ट्विट सेहवागनं केलं पण हे ट्विट चुकल्याचं बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टानं सेहवागला दाखवून दिलं. इंडोनेशिया ओपन जिंकणारी सायना नेहवाल पहिली भारतीय होती. किदांबी श्रीकांत हा पहिला पुरुष खेळाडू आहे, असा रिप्लाय ज्वालानं सेहवागला दिला.
First Indian was saina...he's the first male player from India to win #Indonesianopen
— Gutta Jwala (@Guttajwala) June 18, 2017
सायना नेहवालनं महिला एकेरीमध्ये २०१० आणि २०१२ साली इंडोनेशिया ओपनचा किताब जिंकला. बॅडमिंटन क्रमवारीमध्ये २२ व्या क्रमांकावर असलेल्या श्रीकांतनं रविवारी झालेल्या फायनलमध्ये जपानच्या काजुमासा साकाईला हरवत इंडोनेशिया ओपनवर आपलं नाव कोरलं.