ऑकलंड : भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या दुसरा टी-२० सामना सुरु असताना मैदानात अजब प्रकार घडला. टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला ८० धावांनी पराभाव पत्कारावा लागला होता. या सामन्यात भारताला मालिका वाचवण्यासाठी 'करो या मरो'ची भूमिका साकारावी लागणार आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यात धडाकेबाज सुरुवात करुन देणारा न्यूझीलंडचा सलामीवीर सिफर्टला लवकरच मैदान सोडावे लागले. त्यानंतर न्यूझीलंजचा कर्णधार केन विलियमसन आणि मुनरो यांनी संयमी खेळी करत डाव सावरला. अखेर कृणाल पांड्याने मुनरोला झेल बाद केले. त्याच षटकात पांड्याने एक विकेट घेतल्यामुळे संपूर्ण मैदानात आश्चर्यजनक वातावरण निर्माण झाले.
कृणाल पांड्या गोलंदाजीवर डॅरेल मिचेलला पायचीत झाला. पंचांनी आऊट दिल्यामुळे मिचेलला डीआरएसची (DRS) मदत घ्यावी लागली. प्रथम चेंडू त्याच्या बॅटला लागून गेल्याची मिचेलला कल्पना होती. त्यामुळे त्याने काही विचार न करता डीआरएस घेतला. डीआरएसमध्ये चेंडू साफपणे त्याच्या बॅटला घासून गेल्याचे आढळले. तरीदेखील थर्ड अम्पायरनं त्याला बाद ठरवले. थर्ड अम्पायरनं दिलेला निर्णय बदलता येत नसल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले.