नागपूर : विदर्भाच्या पोट्ट्यांनी सलग दुसऱ्यांदा रणजी करंडकावर आपले नाव कोरले आहे. व्हीसीए स्टेडीयममध्ये पार पडलेल्या अंतिम सामन्यात विदर्भाने सौराष्ट्राचा ७८ रननी पराभव केला आहे. या विजयात विदर्भाच्या आदित्य सरवटे आणि अक्षय वाखरे या जोडीने मह्त्तवपूर्ण योगदान दिले आहे.
विदर्भाने सौराष्ट्राला विजयासाठी २०६ रनचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या सौराष्ट्राला विदर्भाने १२७ रनवर रोखले. सौराष्ट्राच्या बॅट्समननी विदर्भाच्या आदित्य सरवटे-अक्षय वाखरे या जोडीसमोर शरणागती पत्कारली. सरवटे-वाखरे या फिरकीपटू जोडीने सौराष्ट्राच्या दुसऱ्या डावात ९ विकेट घेतल्या. यात आदित्य सरवटेने अवघ्या २४ ओव्हरमध्ये केवळ ५९ रन देत ६ विकेट मिळवल्या. तर अक्षय वाखरेने २२.४ ओव्हर टाकून ३७ रनच्या मोबदल्यात ३ विकेट घेतल्या.
विदर्भ आणि सौराष्ट्र यांच्यामध्ये झालेल्या रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये विदर्भाने नाणेफेक जिंकत आधी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात विदर्भाने सर्वबाद ३१२ रन केल्या. विदर्भाकडून पहिल्या डावात अक्षय कर्नेवारने ७३ धावांची सर्वाधिक खेळी केली. तर अक्षय वाडकर, मोहित काळे, अक्षय वाखरे आणि गणेश सतिश यांनी अनुक्रमे ४५, ३५, ३४, ३२ रनची खेळी केली. सौराष्ट्राकडून पहिल्या डावात सर्वाधिक ३ विकेट जयदेव उनाडकटने घेतल्या. तर चेतन साकरिया आणि कमलेश मकवाना यांनी प्रत्येकी २-२ तर प्रेरक मांकड आणि धर्मेंद्रसिंह जडेजाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
विदर्भाने पहिल्या डावात केलेल्या ३१२ रनचा पाठलाग करायला आलेल्या सौराष्ट्रने प्रत्युतरादाखल ३०७ रन केल्या. चेतेश्वर पुजारा सौराष्ट्रच्या टीममध्ये असल्यामुळे त्यांचं पारडं जड होतं. पण पुजाराला विशेष कामगिरी करता आली नाही, पुजारा अवघी १ रन करुन परतला. सौराष्ट्रकडून पहिल्या डावात स्नेल पटेलने १०२ रनची खेळी केली. स्नेलच्या या शतकाच्या जोरावर सौराष्ट्राला पहिल्या डावात ३०७ रनची मजल मारता आली. सौराष्ट्राला ३०७ रनवर गुंडाळल्याने दुसऱ्या डावात विदर्भाला ५ रनची नाममात्र आघाडी मिळाली. विदर्भाकडून पहिल्या डावात आदित्य सरवटेने ५ तर अक्षय वाखरेने ४ विकेट घेतल्या. तसेच उमेश यादवने १ विकेट घेतली.
पहिल्या डावात मिळालेल्या ५ रनच्या आघाडीसोबत विदर्भाचा संघ दुसऱ्या डावाचा खेळ करायला आली. विदर्भाने दुसऱ्या डावात सर्वबाद २०० रन केल्या. विदर्भाकडून दुसऱ्या डावात आदित्य सरवटेने ४९ रनची सर्वाधिक खेळी केली. तसेच मोहित काळे आणि गणेश सतिश याने अनुक्रमे ३८ आणि ३५ रन केल्या.
पहिल्या डावात विदर्भाला मिळालेली ५ रनची आघाडी आणि दुसऱ्या डावात केलेल्या २०० रनच्या जोरावर विदर्भाने सौराष्ट्राला विजयासाठी २०६ रनचे आव्हान दिले. या आव्हानचा पाठलाग करायला आलेल्या सौराष्ट्रला सुरुवातीपासूनच आदित्य सरवटे आणि अक्षय वाखरे या जोडीने हैराण करुन सोडले. सौराष्ट्राच्या ३ विकेट २२ रनवर गेल्या होत्या. सरवटे-वाखरे या जोडीने दुसऱ्या डावात कोणत्याच खेळाडूला मैदानात स्थिर होऊ दिले नाही. दुसऱ्या डावातील १० पैकी ९ विकेट सरवटे-वाखरे जोडीने घेतल्या. सौराष्ट्राची टीम १२७ रनवर ऑलआऊट झाली. सौराष्ट्रकडून दुसऱ्या डावात विश्वराज जडेजाने सर्वाधिक ५२ रन केल्या.
या अंतिम सामन्यात विदर्भाकडून आदित्य सरवटे आणि अक्षय वाखरे या जोडीने कमाल केली. या जोडीने विदर्भाच्या विजयाचा पाया रचला. आदित्य आणि अक्षयनं सौराष्ट्रच्या पहिल्या डावात ९ विकेट घेतल्या. यात आदित्यने ५ तर अक्षयने ४ विकेट घेतल्या. तर पहिल्या डावात फलंदाजी करताना अक्षय वाखरेने ३४ धावा केल्या.
तसेच दुसऱ्या डावात या जोडीने आपली फिरकीची जादू कायम ठेवत एकूण ९ विकेट घेतल्या. यात सर्वाधिक आदित्य सरवटेने ६ तर अक्षय वाखरने ३ विकेट घेतल्या. म्हणजे एकूणच या सामन्यातील सौराष्ट्राच्या २० विकेटपैकी १८ विकेट या जोडीनेच घेतल्या. तर दुसऱ्या डावात आदित्य सरवटने ४९ धावा केल्या. या मॅचमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदित्य सरवटेला सामनाविराचा किताब देऊन गौरवण्यात आलं.