विराट हा रेकॉर्डही करणार? एकाच दिवशी २ मॅच खेळणार?

भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं इंग्लंड दौऱ्यासाठीच्या तयारीच्या सगळ्या शक्यता खुल्या ठेवल्या आहेत.

Updated: May 12, 2018, 07:14 PM IST
विराट हा रेकॉर्डही करणार? एकाच दिवशी २ मॅच खेळणार? title=

मुंबई : भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं इंग्लंड दौऱ्यासाठीच्या तयारीच्या सगळ्या शक्यता खुल्या ठेवल्या आहेत. गरज पडली तर विराट कोहली वोरेस्टरमध्ये इंग्लंड लायन्सविरुद्ध भारत ए टीमकडून ४ दिवसांचा सराव सामना खेळू शकतो. एवढच नाही तर कोहली एकाच दिवशी २ मॅचही खेळण्याचा अंदाज वर्तवला जातोय. आयर्लंडविरुद्ध भारत २७ आणि २९ जूनला २ टी-20 मॅच खेळणार आहे. तर सरेकडून काऊंटी खेळणाऱ्या विराटची यॉर्कशायरविरुद्ध २५ ते २८ जूनपर्यंत मॅच आहे. त्यामुळे विराट यॉर्कशायरविरुद्धची मॅच खेळून ५ तासांचा प्रवास करून आयर्लंडविरुद्धची मॅच खेळायला डबलिनला पोहोचेल, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. विराटबद्दलची भूमिका अजूनही स्पष्ट नाही पण विराट राष्ट्रीय प्रतिबद्धता पूर्ण करण्यासाठी यॉर्कशायरविरुद्धची मॅच सोडू शकतो, अशी तरतुद सरेमध्ये आहे, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं पीटीआयला दिली आहे.

विराट आयर्लंडविरुद्ध खेळणार का नाही हे इंग्लंडमधल्या हवामानावर अवलंबून आहे. इंग्लंडमधल्या मोसमाची काहीच शाश्वती नाही. त्यामुळे हॅम्पशायर आणि समरसेटविरुद्धच्या मॅचमध्ये हवामानानं खेळखंडोबा केला तर विराट यॉर्कशायरविरुद्धची मॅच खेळेल, असंही बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले. भारत ए आणि इंग्लंड लायन्समध्ये १६ जुलैला चार दिवसांची मॅच सुरु होणार आहे. तर भारत इंग्लंडविरुद्ध शेवटची वनडे १७ जुलैला खेळणार आहे. त्यामुळे हा सराव सामना १९ जुलैपासून खेळवण्यात यावा, अशी मागणी बीसीसीआय इंग्लंड बोर्डाकडे करणार आहे. हा सामना १९ जुलैपासून सुरु झाला तर लोकेश राहुल आणि विराट कोहलीदेखील खेळू शकतात.

आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-20साठी भारतीय टीम

विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, सुरेश रैना, मनिष पांडे, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, जसप्रित बुमराह, हार्दिक पांड्या, सिद्धार्थ कौल, उमेश यादव

टी-20 सीरिजचं वेळापत्रक

२७ जून- भारत विरुद्ध आयर्लंड- पहिली टी-20

२९ जून- भारत विरुद्ध आयर्लंड- दुसरी टी-20

३ जुलै- भारत विरुद्ध इंग्लंड- पहिली टी-20

६ जुलै- भारत विरुद्ध इंग्लंड- दुसरी टी-20

८ जुलै- भारत विरुद्ध इंग्लंड- तिसरी टी-20