पटना : रणजी ट्रॉफीमध्ये सध्या एका बॉलरनं जोरदार धुमाकूळ घातला आहे. बिहारचा डावखुरा स्पिनर आशुतोष अमननं नागालँडविरुद्धच्या मॅचमध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये ५ आणि मॅचमध्ये १२ विकेट घेतल्या. आशुतोषच्या या कामगिरीमुळे बिहारनं नागलँडचा २७३ रननी पराभव केला आणि ६ पॉईंट्स मिळवले. विजयासाठी ४४६ रनचा पाठलाग करताना नागलँडची टीम दुसऱ्या इनिंगमध्ये १७३ रनवर ऑल आऊट झाला.
बिहारनं या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये १५० रन केल्या. यानंतर नागालँडला त्यांच्या पहिल्या इनिंगमध्ये २०९ रन करता आल्या. पण बिहारनं दुसऱ्या इनिंगमध्ये ५०५/८ एवढा मोठा स्कोअर उभारला. त्यामुळे नागलँडला विजयासाठी ४४७ रनची आवश्यकता होती. या आव्हानाचा पाठलाग करताना नागलँडचा १७३ रनवर ऑल आऊट झाला.
मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या आशुतोषनं दुसऱ्या इनिंगमध्ये ४९ रन देऊन ५ विकेट घेतल्या. या मॅचमध्ये त्यानं ९६ रन देऊन १२ विकेट घेतल्या. ४ मॅचमध्ये तिसऱ्यांदा आशुतोषला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं आहे. तर आशुतोषनं लागोपाठ चौथ्या मॅचमध्ये १० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत. आशुतोषनं १० इनिंगमध्ये ५.५४ च्या सरासरीनं ५१ विकेट घेतल्या आहेत.
आशुतोष अमन याचा जन्म बिहारच्या गयामध्ये १९ मे १९८६ साली झाला होता. ३२ वर्षांचा अमन बिहारकडूनच रणजी ट्रॉफी खेळतो. आशुतोष अमन हा डावखुरा स्पिनर आहे. गयाच्या डेल्हामध्ये राहणारा आशुतोष सैन्यात नोकरी करतो. पहिले आशुतोष अमन क्लब क्रिकेट खेळायचा. बिहारमध्ये १८ वर्षानंतर क्रिकेटचं पुनरागमन झालं तेव्हा त्याला आपल्या राज्याकडून खेळण्याची संधी मिळाली.
या विजयाबरोबरच बिहारचे ६ मॅचमध्ये २७ अंक झाले आहेत. रणजी ट्रॉफी प्लेट ग्रुपमध्ये बिहार उत्तराखंडपेक्षा १० अंकांनी कमी आहे. उत्तराखंडनं एक मॅच जास्त खेळली आहे. उत्तराखंडनं ७ पैकी ५ मॅचमध्ये विजय मिळवला आहे. याच ग्रुपमध्ये झालेली दुसरी मॅच पुडुच्चेरी आणि उत्तराखंडमधली मॅच ड्रॉ झाली. मॅच ड्रॉ झाल्यामुळे दोन्ही टीमना एक-एक अंक मिळाला.