नवी दिल्ली : तुम्ही जर लक्झरी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. जर्मनीतील लक्झरी कार निर्माता कंपनी ऑडीने (Audi) आपल्या काही कार वर तब्बल १० लाख रूपयांपर्यंतची सूट देण्याची घोषणा केली आहे.
ऑडी कंपनीने आपल्या A3, A4, A6 आणि Q3 मॉडल्स वर 2.5 लाख ते 9.7 लाख रुपयांपर्यंत सूट देण्याची घोषणा केलीय. या सोबतच कंपनीने हफ्त्यांवर कार खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठीही चांगली ऑफर लॉन्च केली आहे. या वर्षी म्हणजेच 2018 मध्ये तुम्ही आपली फेव्हरेट कार खरेदी केली तर तुमच्या कारचा ईएमआय पुढील वर्षापासून सुरु होणार आहे. मात्र, ही ऑफर ठराविक कालावधीसाठी असल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे.
या ऑफरमुळे Audi A3 कारची किंमत 33.10 लाख रुपयांवरुन 27.9 लाख रुपये झाली आहे. त्याच प्रमाणे Audi A4 ची किंमत 41.47 लाख रुपयांवरुन 35.99 लाख रुपये झालीय. Audi A6 ची किंमत 56.69 लाख रुपयांवरुन 46.99 लाख रुपये आणि Audi Q3 च्या मॉडल्सची किंमत 34.73 लाख रुपयांवरुन 31.99 लाख रुपये झाली आहे.
सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. या दरम्यान आता ऑडी कंपनीने आपल्या कारच्या किमतीत मोठी कपात केली आहे. बाजार विश्लेषकांच्या मते, ऑडी कंपनीने दिलेल्या या ऑफरनंतर आता ऑडी कारच्या खरेदीत मोठी वाढ पहायला मिळण्याची शक्यता आहे.