Cyber Crime: धक्कादायक! Tinder Match निघाला Scammer; महिलेला 4.5 लाखांचा गंडा

Bengaluru Woman Duped By Tinder Match: या डेटिंग अ‍ॅपवरुन ओळख झाल्यानंतर महिन्याभरात ही महिला या व्यक्तीच्या प्रेमात पडली आणि त्याच्यावर विश्वास ठेऊ लागली. या व्यक्तीने आपण परदेशात कामाला असल्याचं या महिलेला सांगितलं होतं.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 30, 2023, 04:40 PM IST
Cyber Crime: धक्कादायक! Tinder Match निघाला Scammer; महिलेला 4.5 लाखांचा गंडा title=
ऑनलाइन माध्यमातून घालण्यात आला गंडा

Woman Duped By Tinder Match: बंगळुरुमध्ये (Bengaluru) ऑनलाइन डेटींग अ‍ॅपवरुन फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ऑनलाइन माध्यमातून होणारी फसवणूक आता काही नवीन राहिलेली नाही. मात्र हल्ली नवीन नवीन माध्यमातून लोकांची आर्थिक फसवणूक केली जाते. असाच काहीसा प्रकार भारताची टेक सिटी अशी ओळख असलेल्या बंगळुरुमध्ये घडला आहे. केवळ व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियावरुन नाही तर आता डेटिंग अ‍ॅपवरुनही मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकार घडत असून बंगळुरुमधील एका महिलेलाही अशाप्रकारे तब्बल 4 लाख 50 हजारांचा गंडा घालण्यात आला. आर्थिक फसवणुकीबरोबरच या प्रकरणामध्ये फसवणूक करणाऱ्याने वापरलेला मार्गही सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

टिंडरवर झाली ओळख अन्...

समोर आलेल्या माहितीनुसार बंगळुरुमधील एका खासगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या 37 वर्षीय महिलेबरोबर हा प्रकार घडला आहे. टिंडर या डेटिंग अ‍ॅपवरुन या महिलेला गंडा घालण्यात आला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे. या महिलेला गंडा घालणाऱ्या व्यक्तीचं टिंडरवरील नाव अद्विक चोप्रा असं होतं. आपण लंडन, ब्रिटन येथे मेडिकल क्षेत्रात काम करतो असं या व्यक्तीने महिलेला सांगितल्याचं 'द इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. टिंडरवर राईट स्वाइप करुन प्रेमात पडल्यानंतर या दोघांमधील गप्पा वाढल्या. त्यानंतर ही महिला या व्यक्तीच्या प्रेमात पडली आणि त्याच्यावर विश्वास ठेऊ लागली. आपण काही कामानिमित्त बंगळुरुला येत आहोत असं या व्यक्तीने माहिलेला सांगितलं. याचनंतर सुरु झाला फसवणुक करणाऱ्या स्कॅमरचा खरा डाव.

भारतात येतोय सांगितलं अन्...

17 मे रोजी या महिलेला एका अज्ञात क्रमांकावरुन फोन आला. या फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण भारतीय विमान प्राधिकरणातील अधिकारी असल्याचा दावा केला. चोप्रा नावाच्या तुमच्या मित्राला आम्ही बेहिशोबी रोकड परदेशातून आणल्याप्रकरणी ताब्यात घेतलं असल्याचं या व्यक्तीने सांगितलं. चोप्राला बंगळुरुला पाठवण्यासाठी 68 हजार 500 रुपये ट्रान्सफर करण्याची मागणी या महिलेकडे या फोनवरुन करण्यात आली. एकूण रक्कम आणि प्रोसेसिंग चार्जेसच्या नावाखाली या महिलेकडून या व्यक्तीने 2 लाख 6 हजार रुपये ऑनलाइन माध्यमातून ट्रान्सफर करुन घेतले.

परत पैसे मागितले तेव्हा शंका आली असता...

2 लाखांहून अधिक रक्कम ट्रान्सफर करुन घेण्याचा प्रकार एकदा नाही तर दोन वेळा घडला. चोप्रा आपल्याला भेटण्यासाठी येत असताना हे घडलं म्हणून या महिलेने एवढी रक्कम फोनवरील व्यक्तीने सांगितलेल्या खात्यावर पाठवली. मात्र त्यानंतर या व्यक्तीने फोनवरुन आणखीन 6 लाख रुपयांची मागणी केली तेव्हा या महिलेला काहीतरी गडबड असल्यासारखं वाटलं. तिने खोदून खोदून या व्यक्तीला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली तेव्हा फोन अचानक कट झाला आणि त्यानंतर ना या व्यक्तीचा फोन आला ना तिच्या चोप्रा नावाच्या टिंडरवरील जोडीदराचा. ही प्रोफाइलही डिलीट करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचं समजल्यानंतर या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली असून अधिकारी आणि या महिलेशी ऑनलाइन गप्पा मारणारा व्यक्ती एकच होती की दोघांनी मिळून तिला फसवलं आहे यासंदर्भातील तपास पोलीस करत आहेत. मात्र या प्रकरणामुळे डेटिंग अ‍ॅपवरुन एखाद्याशी संवाद साधताना अधिक सावध राहण्याची गरज असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.