Bharat NCAP Car Safety Rating: आजचा दिवस भारतीय वाहन उद्योगासाठी फार खास आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी आज भारतीय कार क्रॅश टेस्ट उपक्रमाचं उद्घाटन नवी दिल्लीमध्ये केलं आहे. या नव्या मानांकनाचं नामकरण 'भारत एनसीएपी' असं करण्यात आलं आहे. या उपक्रमाला 'भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम' असंही म्हटलं जात आहे. 22 ऑगस्ट 2023 रोजी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्र्यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात झाली. म्हणजेच भारतात निर्मिती होणाऱ्या कार्सच्या सुरक्षेच्या मानांकनाच्या चाचण्या देशात घेता येणार आहे. वाहनं किती सुरक्षित आहेत आणि सुरक्षेसंदर्भातील त्याला किती मानांकन दिलं जाणार हे देशातील या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून ठरवलं जाईल. म्हणजेच भारत कार्सच्या रेटींगसंदर्भातही आत्मनिर्भर होणार आहे. आता भारताला कार रेटिंगसाठी ग्लोबल रेटिंग एजन्सीवर अवलंबून रहावं लागणार नाही. मात्र ही चाचणी नेमकी कशी केली जाणार पाहूयात...
आजपासून देशात भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम सुरु होणार आहे. 22 ऑगस्ट 2023 रोजी Bharat NCAP प्रोग्राम सुरु होणार आहे. हा देशातील पहिला कार क्रॅश टेस्ट प्रोग्राम आहे. क्रॅश रिपोर्टच्या आधारावरच गाड्या किती सुरक्षित आहे याचं रेटिंग दिलं जाईल. आता या उपक्रमामुळे भारतात तयार होणाऱ्या गाड्यांच्या सुरक्षेचा दर्जा भारतातच निश्चित केला जाणार आहे. या नवीन उपक्रमाअंतर्गत 3.5 टनपर्यंत वजन असलेल्या वाहनांची क्रॅश टेस्ट भारतात घेतली जाणार आहे.
देशात ऑटोमोटीव्ह इंडस्ट्री (एआयएस) 197 अंतर्गत कार्सच्या चाचण्या केल्या जातील. या चाचणीमधील कामगिरीच्या आधारे कार्सला टेस्ट रेटिंग दिला जाईल. प्रवासी, चाइल्ड ऑक्युपेंट्स स्टार रेटिंग या उपक्रमाच्या माध्यमातून दिली जाईल. हे रेटिंग 0 ते 5 दरम्यान असणार आहे. जागतिक स्तरावरील एनसीएपी रेटिंगसुद्धा 0 ते 5 दरम्यान दिलं जातं. कार्स धडकल्यानंतर त्या किती सुरक्षित असतील हे 0 ते 5 दरम्यानच्या मानांकनने ठरवलं जातं. 5 रेटिंग असणारी कार ही सर्वात सुरक्षित असते. यामध्ये दशांशात म्हणजेच 4.5 किंवा 3.7 वगैरे पद्धतीनेही रेटींग दिलं जातं.
Live from the Launch of ‘Bharat New Car Assessment Program’ (Bharat NCAP), New Delhi. #BharatNCAP
https://t.co/NOhSXbUYP9— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 22, 2023
भारतामधील कार क्रॅश रेटिंग देण्याची जबाबदारी एआरएआय म्हणजेच ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाकडे सोपवण्यात आली आहे. भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्रामसाठी सर्व चाचण्या करण्याची, त्यांचं रेटिंग निश्चत करण्याची जबाबदारी एआरएआयकडेच आहे. यासाठी पुण्यातील चाकणमध्ये एआरएआयची एक आधुनिक तंत्रज्ञाने युक्त अशी लॅब सुरु करण्यात आली आहे. याच लॅबमध्ये कार्सच्या चाचण्या होतील. एआरएआयने 800 हून अधिक प्री-एनसीएपी क्रॅश चाचण्या केल्या आहेत. एआरएआय आंतरराष्ट्रीय दर्जानुसार या चाचण्या घेणार असून त्यावर आधारित रेटिंग दिलं जाणार आहे.