Cyber Crime Make Women Lawyer Strip: कमी शिक्षण असलेल्या किंवा अगदीच अशिक्षित लोकांनाच सायबर गुन्हेगारीचा फटका बसतो असं वाटत असेल तर बंगळुरुमधील या घटनेबद्दल वाचल्यावर तुमचा हा गैरसमज दूर होईल. अगदी उच्च शिक्षित महिला वकिलाला सुद्धा सायबर गुन्हेगारांनी आपल्या जाळ्यात ओढल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिला वकिलाला 14 लाखांचा गंडा घालण्याबरोबरच व्हिडीओ कॉल सुरु असताना तिला कपडे काढण्यासही भाग पाडण्यात आलं. अमली पदार्थांची चाचणी घेत आहे असं सांगत या महिलेला कॉल सुरु असताना कपडे उतरवण्यास सांगण्यात आलं. नंतर या महिलेचे हे नग्नावस्थेतील व्हिडीओ वापरुन तिला ब्लॅकमेल करण्यात आलं. या माध्यमातून नंतर तिच्याकडून 10 लाखांची वसुली सायबर चोरांनी केली. आपल्याला ब्लॅकमेल करुन अशाप्रकारे फसवणूक सुरुच राहील हे लक्षात आल्यानंतर या महिलेने पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइममधील अधिकारी आणि सीबीआय अधिकारी असल्याचा बनाव करुन या महिलेची फसवणूक करण्यात आली. या 29 वर्षीय महिलेच्या घरातील सर्व व्हिडीओ कॅमेरा आणि मायक्रोफोन्सवर सायबर चोरांनी ताबा मिळवून तिला एकाप्रकारे ओलीस ठेवण्यात आलं होतं. या महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, 3 एप्रिल रोजी पहिल्यांदा हा वाद सुरु झाला. फेडेक्समधून बोलतोय असं सांगून तिला एका व्यक्तीचा कॉल आला. तुमचं एक पार्सल परत आलं आहे असं तिला सांगण्यात आलं. हे पार्सल मुंबईवरुन थायलंडला पाठवण्यात आलं होतं. या पार्सलमध्ये 5 पासपोर्ट, 3 क्रेडिट कार्ड आणि बंदी घालण्यात आलेल्या औषधाच्या 140 गोळ्या होत्या असं या महिला वकिलाला सांगण्यात आलं. मात्र या महिलेने आपलं या पार्सलशी काही देणंघेणं नसल्याचं समोरच्या व्यक्तीला कळवलं. मात्र तुम्हाला या चोरांचा शोध घेण्यासाठी यासंदर्भात मुंबईतील सायबर टीमशी संपर्क करायचा आहे का? असं विचारण्यात आलं. जेव्हा या महिलेने होकार कळवला तेव्हा तिचा फोन दुसरीकडे ट्रान्सफर करण्यात आला. समोरील व्यक्तीने तो सायबर गुन्हे शाखेचा सदस्य असल्याचं सांगितलं.
या व्यक्तीने महिला वकिलाला स्काइप डाऊनलोड करायचा सांगितलं आणि त्या माध्यमातून कॉलवरुन बोलणं सुरु केलं. "मी स्काइप डाऊनलोड केल्यानंतर त्यांनी माझ्या कथित बेकायदेशीर पार्सलबद्दल माहिती विचारली. त्यांनी माझ्या आधारकार्डवरील माहितीही विचारली. त्यानंतर या व्यक्तीने तिच्या वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर माझा आधारकार्ड क्रमांक हा मानवी तस्करीसंबंधितील गुन्ह्यांसाठी आणि अंमली पदार्थांसंदर्भातील गुन्ह्यांसाठी हाय अलर्टवर असल्याचं कळवण्यात आलं. त्यानंतर हा कॉल कथित सीबीआय अधिकाऱ्याकडे वळवण्यात आला. या अधिकाऱ्याचं नाव अभिषेक चौहान असल्याचं सांगण्यात आलं. त्यांनी मला कॅमेरा सुरु ठेवून बोलण्यास सांगितलं," असं महिलेने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे. त्या कथित अधिकाऱ्याने माझी सर्व माहिती नोंदवून घेतली. यामध्ये माझ्या खात्यावर किती रक्कम शिल्लक आहे. माझा पगार किती आहे, मी किती गुंतवणूक केली आहे याचाही समावेश होता.
नक्की वाचा >> तिने दुकानदारासमोरच बदलली पॅण्ट! Reel च्या नादात मर्यादा सोडली; Video मुळे संतापाची लाट
"त्यानंतर त्याने मला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तुला गुप्ततेची शपथ घ्यावी लागेल असं सांगितलं. चौकशी पूर्ण होईपर्यंत तू कोणतीही माहिती बाहेर कोणालाही सांगणार नाही असं आम्हाला आश्वासन द्यावं लागेल," असं अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं पीडित महिलेने म्हटलं आहे. आपल्याला कुटुंबातील सदस्यांशी किंवा पोलिसांशी बोलायचं आहे असं या महिलेने सांगितल्यानंतर तुझ्याच सुरक्षेसाठी तू असं काहीही करु नकोस, असं तिला या सायबर चोरांनी सांहितलं. त्यानंतर तिला बँक कर्मचाऱ्यांच्या नावाने कोणीतरी मनी लॉन्ड्रींग आणि मानवी तस्करी करत असल्याचं सांगून भिती दाखवण्यात आलं. "या हायप्रोफाइल प्रकरणांमध्ये पोलीस आणि नेते मंडळींचा समावेश असतो असा संदर्भ देत मला सहकार्य करण्यास आणि कोणालाही काहीही माहिती न देण्यास सांगण्यात आलं. त्या दिवशी संपूर्णवेळ ते लोक कॅमेरामधून माझ्यावर लक्ष ठेऊन होतो. त्यांनी मला माझा वेबकॅम सुरु करण्यासा सांगितला. तसेच मी कोणाला मेसेज किंवा ईमेल करत नाही ना यावर लक्ष ठेवण्यासाठी माझी स्क्रीन शेअर करण्यास सांगितलं. त्या तारखेला दिवसभर आणि अगदी रात्रीही माझ्यावर वेबकॅममधून लक्ष ठेवण्यात आलं. कॅमेरा सुरु ठेऊनच मला झोपण्यास सांगण्यात आलं," असं ही महिला वकील म्हणाली आहे.
नक्की वाचा >> 21 वर्षीय प्रेयसीसोबत न्यूड डान्स केल्याने 54 वर्षीय मुंबईकर अडचणीत! फ्लॅटवर गेला अन्..
दुसऱ्या दिवशी या कथित सीबीआय अधिकाऱ्याने 'आरबीआयच्या नियमांनुसार' असं म्हणत या महिला वकिलाला तिच्या सर्व खात्यांवरील पैसे एका डमी अकाऊंटवर ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आलं. तुमच्या खात्यावरील आर्थिक व्यवहारांची चाचपणी करण्यासाठी हे आवश्यक असल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला. या महिलेला तिच्या बँकमध्ये जाऊन बँक खात्यावरील 10 लाख 79 हजार रुपये त्याच बँकेत तिच्याच नावाच्या दुसऱ्या खात्यावर वळवण्यास सांगण्यात आलं. हे सारं करताना तू सतत फोनवर उपलब्ध राहा आणि फोनची स्क्रीन शेअर कर असं महिलेला बजावण्यात आलं होतं. तिने तसेच केले. काही तासांमध्ये या महिलेने तिच्या खात्यावरील पैसे वळवले. सर्व व्यवहार तपासले असले तरी तुमच्या क्रेडिट कार्डसंदर्भातील व्यवहारांमध्ये काहीतरी गोंधळ आढळून आल्याचं या महिलेला नंतर कळवण्यात आलं. तिला एक अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून सायबर चोरांनी 5 हजार डॉलर म्हणजेच 4.16 लाख रुपयांचे बिटकॉइन्स विकत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र हा व्यवहार पूर्ण झाला नाही. त्यानंतर या महिलेला तिच्या अकाऊंटवरील युझर लिमीट वाढवण्यास सांगण्यात आलं. त्यानंतरही दोनदा हा बिटकॉन्सचा व्यवहार अपयशी ठरला. तुमच्या कार्डचा गैरवापर होऊ नये म्हणून कार्डचे फोटो पाठवण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर 5 एप्रिल रोजी तिच्या कार्डवरुन 2.04 लाख रुपये आणि 1.73 लाख रुपयांची शॉपिंग करण्यात आली. बँकेच्या कस्टमर केअरकडून कॉल आल्यानंतर या महिलेला तिने शॉपिंग केल्याचं मान्य करण्यास सांगण्यात आलं. असं न केल्यास ही केस बंद करता येणार नाही असं तिला या फसवणूक करणाऱ्यांनी सांगितलं.
फसवणूक करणारे सायबरचोर एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी अंमली पदार्थांची चाचणी करण्याच्या नावाखाली या महिलेला कपडे काढण्यास भाग पाडलं. "त्यांनी माझ्याकडून सर्व पैसे घेतल्यानंतर अभिषेक चौहानने अंमली पदार्थांच्या चाचणीसाठी तयार राहा असं मला सांगितलं. त्यांनी मला कपडे काढण्यास भाग पाडलं. चाचणीच्या नावाखाली माझे नको त्या अवस्थेतील व्हिडीओ त्यांनी कॉलदरम्यान रेकॉर्ड केले. मी नग्नावस्थेत असताना त्यांनी मला जे सुरु आहे ते सुरुच ठेव नाहीतर आम्ही तुला अटक करु असं सांगितलं. तसेच माझ्या कुटुंबालाही या ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी त्यांनी दिली. तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवून टाकू अशी धमकी त्यांनी मला दिली," असं या महिला वकिलाने एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
त्यानंतर या महिला वकिलाला या सायबर चोरांनी ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तिचे नग्नावस्थेतील व्हिडीओ आम्ही विकू तसेच डार्क वेबवर अपलोड करु अशी धमकी देत दुपारी 3 वाजेपर्यंत 10 लाख रुपये दे अशी धमकी देण्यात आली. यानंतरच महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.