मुंबई : रिलायन्स जिओच्या 4G फिचर फोनचं बिटा टेस्टिंग सुरू झालं आहे. सध्या हा फोन फक्त ठराविक ग्राहकांना देण्यात आला आहे. या फोनमध्ये काही दोष आहेत का हे पाहण्यासाठी या फोनचं बिटा ट्रायल सुरू आहे. जिओच्या या फोनचं बुकिंग २४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पण दिल्ली एनसीआर भागामधल्या काही रिटेल स्टोर्समध्ये या फोनच्या ऑफलाईन प्री ऑर्डर घ्यायला सुरुवात झाली आहे.
जिओ रिटेलरकडून हा फोन घ्यायचा असेल तर ग्राहकाला त्याच्या आधार कार्डची झेरॉक्स आणि एक फोटो द्यावा लागणार आहे. आधार कार्डाशिवाय फोनचं बुकिंग जिओच्या आऊटलेटमध्ये करता येणार नाही. आधार कार्डची झेरॉक्स दिल्यावर ग्राहकाला जिओकडून टोकन नंबर मिळणार आहे. फोन घेताना हा टोकन नंबर कामाला येणार आहे. एका आधार कार्डवर ग्राहकांना एकच फोन मिळणार आहे.
जिओचा हा फोन घेण्यासाठी ग्राहकांना १५०० रुपयांचं सिक्युरिटी डिपॉजिट द्यावं लागणार आहे. ३६ महिन्यांनंतर ग्राहकांना हे सगळे पैसे परत मिळणार आहेत.
या फोनचं ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी ग्राहकांना www.jio.com/en-in/jp-keep-me-posted या वेबसाईटवर जाऊन नाव, ईमेल आयडी, शहर/गाव, पिनकोड आणि तुमचा फोन नंबर रजिस्टर करावा लागणार आहे.
SMSवर जिओचा फोन बूक करण्यासाठी JP, तुमचा एरिया, पिनकोड आणि तुमच्या भागात असलेल्या जिओ स्टोरचा कोड टाईप करून 7021170211 या क्रमांकावर SMS करावा लागणार आहे.