पालकमंत्री बच्चू कडू बनले जिल्ह्यातील अनाथ मुलीचे पालक

आपल्या संवेदनशील स्वभावामुळे ओळखले जाणारे अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी लग्नसोहळ्यात खुद्द पालक म्हणूनच हजेरी लावली. सरकार जे नाही करू शकत ते सर्वसाधारण माणूस करू शकतो असे मत त्यांनी यावेळी बोलून दाखवले.

Updated: Jun 13, 2022, 06:27 PM IST
पालकमंत्री बच्चू कडू बनले जिल्ह्यातील अनाथ मुलीचे पालक title=

जयेश जगड,अकोला - सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात मुलीचे लग्न म्हटले की लाखोंचा खर्च येतो. मात्र आई वडिलांचा छत्र हरविलेल्या एका मुलीचा लग्नाचा संपूर्ण भार अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या हॉटेल मराठाच्या मुरलीधर राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कमी केला आहे.  मुलीच्या लग्नाचं संपूर्ण खर्च करून या हॉटेल मध्ये पालकांचे छत्र गमावलेल्या अनाथ कन्येचा लग्न सोहळा पार पडला.

वधू दुर्गा हिच्या आई आणि वडील यांचे आजाराने मृत्यू झाला. यानंतर दुर्गा आपल्या मोठया बहिणीकडे राहत होती. दुर्गाच्या लग्नाचे बोलणे सुरु झआल्यावर दुर्गाच्या बहिणीला लग्नाच्या खर्चाचा प्रश्न पडला? लग्न कुठे लावावे ,एवढा पैसा कुठून आणावा हा मुलीच्या बहीणसाठी समोर प्रश्न होता. मात्र त्यांनी मुरलीधर राऊत यांच्या सामाजिक उपक्रमाबद्दल ऐकलं आणि दुर्गाचे लग्न राऊतांच्या हॉटेलमध्ये लावून दिले

 

कोण आहेत मुरलीधर राऊत..?
व्यवसायाने हॉटेलधारक असलेले मुरलीधर राऊत यांनी एलएलबीची डिग्री मिळवली आहे .राऊत हे प्रकाश झोकात आले नोट बंदीच्या काळात. मोदी सरकार ने 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्या त्यावेळी प्रवासात असलेल्या नागरिकांचे हाल झाले. यावेळी राऊत यांनी जेवण करून पैसे कधी ही द्या या नावाने उपक्रम सुरु केला. राऊतांच्या या कार्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ''मन की बात'' कार्यक्रमात घेतली होती. दुर्गाच्या परिस्थिती बद्दल कळताच राऊत यांनी आपली हॉटेल , जेवण निशुल्क उपलब्ध करून दिले. तर अमोल जमोदे यांनी डेकोरेशन तर महेश आंबेकर यांनी फोटोग्राफी निशुल्क केली.

पालकमंत्र्यानी केले कन्यादान..
विशेष म्हणजे आपल्या संवेदनशील स्वभावामुळे ओळखले जाणारे अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी लग्नसोहळ्यात खुद्द पालक म्हणूनच हजेरी लावली. बच्चू कडू यांनी मुलीचे कन्यादान करून नव वरवधूला शुभाशीर्वाद दिले. तसेच सरकार जे नाही करू शकत ते सर्वसाधारण माणूस करू शकतो असे मत त्यांनी यावेळी बोलून दाखवले.  दिवाळी नंतर जिल्हा नियोजन समिती मार्फत एक हजार जोडप्यांच्या सामूहिक विवाहाचा आयोजन करण्यासाठी प्रयत्न करु अशी ग्वाही त्यांनी उपस्थितींना दिली.