यवतमाळ: राळेगाव परिसरात १३ जणांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला ठार मारण्यासाठी राज्य सरकारने प्रसिद्ध शिकारी नवाब शहाफत अली खान यांना पाचारण केले आहे. या वाघिणीमुळे लोकांच्या जीवाला मोठा धोका आहे. त्यामुळे वाघिणीला मारण्याशिवाय पर्याय नाही, असे शहाफत अली खान यांनी सांगितले.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्येच या वाघिणीला पकडता किंवा मारत आले असते. तेव्हापासून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या वाघिणीला बेशुद्ध करण्याचे तीन अयशस्वी प्रयत्न झाले. त्यामुळे ही वाघीण आणखीनच सतर्क आणि आक्रमक झाली आहे. पावसाळ्यात गवत वाढल्याने वाघिणीला लपण्यासाठी सहज जागा मिळत आहे. त्यामुळे या वाघिणीला पकडणे अवघड होऊन बसल्याचे शहाफत खान यांनी सांगितले.
दरम्यान, या वाघिणीला मारण्यासाठी शहाफत अली खान यांच्या करण्यात आलेल्या नेमणुकीला अनेक वन्यप्रेमींनी विरोध केला आहे. शहाफत खान यांना केवळ वाघाला मारण्यामध्येच रस आहे, असा त्यांचा आरोप आहे. मात्र, शहाफत खान यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तर दुसरीकडे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही वाघिणीला मारण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.