वाढत्या कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास पालिका असमर्थ; नातेवाईकांना पैसे मोजावे लागणार

 एकाच महिन्यात ४० लाख रुपयांपर्यंत खर्च झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाला मागणी करूनही निधी न मिळाल्याने वर्धा पालिकेचा निर्णय

Updated: May 9, 2021, 10:10 AM IST
वाढत्या कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास पालिका असमर्थ; नातेवाईकांना पैसे मोजावे लागणार

मिलिंद आंडे, झी मीडिया, वर्धा : वर्धा शहरात कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवरील अंत्यसंस्कारासाठी शुल्क घेण्यात येत नव्हते. पण, एकाच महिन्यात ४० लाख रुपयांपर्यंत खर्च झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाला मागणी करूनही निधी न मिळाल्याने कोविड मृतांवरील अंत्यसंस्कारासाठी अडीच हजार रुपये घेण्यात येणार आहे. पालिकेने तसा निर्णय घेतला आहे. 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर वर्ध्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मागील वर्षभरापासून येथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या हजारांवर मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले. त्याकरीता लागणारा खर्च  नागरिकांकडून घेण्यात आला नाही. त्यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी याकरीता आपत्ती व्यवस्थापन अथवा खनिकर्मकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले. निधीकरीता नगरपालिकेच्या वतीने प्रशासनाला कळविण्यात आले. मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. 

एक एप्रिल ते ३० एप्रिलच्या कालावधीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढली आहे. दररोज एक ते सव्वा लाख रुपये खर्च होत आहे. महिन्याला हा खर्च ३० लाख रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी वर्षभराला लागणारा खर्च आता एक महिन्याला येत आहे.  

राज्यात कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी खर्च घेतल्या जातो. मात्र वर्धा नगरपालिकेत घेण्यात येत नव्हते.  पण, आता खर्च वाढला असल्याने आणि पालिका हा खर्च करण्यास असमर्थ असल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाने निधी न दिल्याने याकरीताचा खर्च घेण्यात येत आहे. वसुधा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेवर अंत्यसंस्काराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र निधी नसल्याने संस्थेच्या कार्यावर ताण आला आहे.. 

अंत्यसंस्कार व दाह संस्काराची जबाबदारी वर्धा पालिकेने वसुधा वुडलेस फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेवर सोपवली. संस्था ना नफा, ना तोटा तत्त्वावर प्रत्येक अंत्यसंस्कार पोटी अडीच हजार रुपये आकारत आहे. जिल्ह्यातील रूग्णासोबतच अन्य जिल्ह्यातून उपचारसाठी आलेल्या मृतकांच्या अंत्यसंस्काराचा खर्च पालिकेने दिला. ३१ मार्च २०२१ पर्यंत ७४५ मृतदेहांवर दाहसंस्कार झाले आहे. त्यापोटी वसुधा संस्थेला पालिकेने १८ लाख ६२ हजार रुपये दिले. १ एप्रिलपासून मृत्यूसंख्या वाढल्याने एका दिवसाचा खर्च एक लाख रुपयावर पोहोचला आहे. 

एप्रिल व मे चा अंदाजित खर्च ६० लाख रुपये अपेक्षित असल्याने हा खर्च पालिकेला करने शक्य नाही. हा पालिकेने आपत्ती व्यवस्थापन निधीतून मंजूर करण्याची विनंती केली आहे.मात्र प्रशासनाकडून कोणतेच उत्तर पालिकेला मिळाले नाही. निधी न दिल्याने आता पालिका प्रशासन खर्च करण्यास असमर्थ असल्याचे सांगण्यात आले. कोविडने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी नातलगांकडून २५०० रुपये घेण्यात यावे, अशा सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता कोविड मृतांच्या अंत्यसंस्काराची निशुल्क सेवा पालिकेच्या वतीने थांबविण्यता आली आहे.