तुमच्या मुलांमध्येही?, कोरोनाचा भयंकर 'साईड इफेक्ट', घरच्या घरी तपासा

कोरोना या श्वसन संस्थेशी संबंधित संसर्गजन्य रोगाने जवळ-जवळ २ वर्ष जगावर राज्य केलं. पण त्यासोबत त्याने अनेक बाबतीत मानवजातीचं नुकसान केलं आहे. कोरोना २ वर्ष कमी अधिक प्रमाणात उफाळून येत होता.

Updated: Feb 19, 2022, 09:19 PM IST
तुमच्या मुलांमध्येही?, कोरोनाचा भयंकर 'साईड इफेक्ट', घरच्या घरी तपासा title=

मुंबई : कोरोना या श्वसन संस्थेशी संबंधित संसर्गजन्य रोगाने जवळ-जवळ २ वर्ष जगावर राज्य केलं. पण त्यासोबत त्याने अनेक बाबतीत मानवजातीचं नुकसान केलं आहे. कोरोना २ वर्ष कमी अधिक प्रमाणात उफाळून येत होता. यामुळे सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास गर्दी करण्यास मनाई होती. अशातच लहान मुलांना धोका जास्त असल्याने शाळा आणि महाविद्यालयं देखील बंद होती.

मुलांच्या चिवचिवाटाने गजबजणाऱ्या, शाळेच्या आवारात मुलांचा पाढे, कविता, धडे वाचण्याचा आवाज बेपत्ता झाला होता. योग्य वेळी, योग्य वयात जे शिकायचं ती वेळ निघून जाताना दिसत होती. कोरोनाने शाळा बंद, मृत्यूचा वाढता आकडा, यात लहान मुलांकडे पाहायला कुणालाही वेळ नव्हता, फक्त  त्यांना आणि आपल्याला संसर्ग होणार नाही, या काळजीने दिवस जात होता.

कोरोनाशी घरातील लहानपासून मोठ्यांपर्यंतची सर्वांची लपाछपी सुरु होती. अखेर कोरोनाने अनेकांचा घात केला, अनेकांची जवळची, घरातील कर्ते मंडळी गेली. आज कोण, उद्या कोण जाणार तर नाही ना? हीच चिंता सतावत होती.

अखेर कोरोनाने अनेक जण हिरावून घेतले आणि काढता पाय घेतला. शाळा सुरु करण्याची मागणी झाली, आज होईल शाळा सुरु, उद्या होईल शाळा सुरु असं सुरु असताना, पूर्णवेळ शाळा अजूनही सुरु झालेल्या नाहीत.

पण त्या आधी लहान मुलांमध्ये कोरोनाचा एक भयंकर साईड इफेक्ट दिसून येत आहे. तुमच्या मुलांनी वयाप्रमाणे आणि आता कोरोनात ते ज्या इयत्तेत शिकत आहेत, त्यापेक्षा त्यांची लिहिण्याची, वाचण्याची क्षमता कमी झाली आहे. अर्थातच यात असंच म्हणायचं आहे, कोरोनामुळे मुलं त्या-त्या वर्गातील अभ्यासात मागे पडले आहेत.

काही मुलांच्या वाचनाची गती कमी झाली आहे, तर काहींची लिहिण्याची गती फारच कमी झाली, प्रत्येक मुलामध्ये अभ्यासाविषयी काही ना काही त्रुटी दिसून येत आहेत. कोरोनात मुलं त्यांच्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासापासून दूर गेले आहेत. हा कोरोनाचा सर्वात मोठा साईड इफेक्ट दिसून येत आहे.

यात त्यांना पुन्हा या ट्रॅकवर आणायचं असेल, तर शिक्षकांप्रमाणे पालकांनाही मुलांवर मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यांचं नियमित वाचन आणि लिखाण घेणं ही आताची गरज झाली आहे. यामुळे ते आणखी वाचन आणि लिखाणापासून दूर जाणार नाहीत. निदान दररोज १ तास तरी यावर जोर देण्याची गरज आहे. तुम्हीही तुमच्या मुलांमध्ये असं काही दिसतंय का? हे तपासा आणि घरच्या घरी यावर उपाय शोधा, अथवा शिक्षक किंवा याविषयातील तज्ञांचा सल्ला घ्या.