Women's health : मेन्स्ट्रुअल कप खरंच योनी मार्गात अडकला तर...?

मेन्स्ट्रुअल कप योनीमार्गात फसू शकतो का? हे खरं आहे का? आज याबाबत जाणून घेऊया.

Updated: Mar 9, 2022, 04:01 PM IST
Women's health : मेन्स्ट्रुअल कप खरंच योनी मार्गात अडकला तर...? title=

मुंबई : मासिकपाळी दरम्यान महिला आजकाल अनेक साधनांचा वापर करतात. यामध्ये सॅनिटरी नॅपकीन, टॅम्पॉन तसंच मेन्स्ट्रुअल कप इत्यादी. मात्र अनेकदा महिला मेन्स्ट्रुअल कप वापरण्यासाठी घाबरतात. हा कप योनीमार्गात अडकला तर? अशा प्रश्न महिलांच्या मनात असतो. मात्र मेन्स्ट्रुअल कप योनीमार्गात फसू शकतो का? हे खरं आहे का? आज याबाबत जाणून घेऊया.

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, सर्व नवीन गोष्टींप्रमाणे, मेन्स्ट्रुअल कप लावणं आणि योनीमार्गातून तो काढणं यासाठी काही प्रमाणात अभ्यासाची गरज असते. एकदा का तुम्हाला याची सवय झाली की, मेन्स्ट्रुअल कपचा वापर करणं तुमच्यासाठी सोपं होतं.

जर तुम्हाला कधी वाटलं मेन्स्ट्रुअल कप अडकलाय किंवा तो सापडत नाही तर घाबरून जाऊ नका. महिलांच्या योनीमार्गात ही गोष्ट कधीही हरवणार नाही. त्यामुळे मेन्स्ट्रुअल कप कधीही अकडून तुमच्या शरीरात फिरू शकणार नाही. त्यामुळे याला योनीमार्गातून बाहेर काढणं नेहमी शक्य आहे, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

शरीराच्या इतर हालचालींमुळे कप गर्भाशयाच्या मुखाकडे जाऊ शकतो. अशावेळी तुम्हाला मेन्स्ट्रुअल कप अडकला असल्याचं वाटू शकतं. अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर मेन्स्ट्रुअल कप बाहेर काढण्यासाठी योग्य पद्धतीचा वापर करावा. 

तज्ज्ञांनी सांगितलंय की, मेन्स्ट्रुअल कप योनीमार्गाच्या आत 24 तासांपेक्षा अधिक वेळ ठेवू नये. यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो.